For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनकडून अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क

06:14 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
चीनकडून अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क
Advertisement

कोळसा-एलएनजी सामील : ट्रम्प यांनी 10 टक्के अतिरिक्त शुल्काचा घेतला होता निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, याच्या प्रत्युत्तरादाखल चीनने देखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या सामग्रीवर शुल्क लादले आहे. अमेरिकेतून आयात होणारा कोळसा-एलएनजीवर 15 टक्के तर कच्चे तेल आणि कृषी यंत्रसामग्री तसेच मोठ्या इंजिन असलेल्या कार्सवर 10 टक्के शुल्क लादण्याची घोषणा चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी केली आहे.

Advertisement

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी रोजी चीनमधून आयात होणाऱ्या सामग्रीवर शुल्क लादण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली होती. हा निर्णय मंगळवारपासून लागू झाला आहे.  तर दुसरीकडे आयात शुल्कावरून चीनने अमेरिकेच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार देखील केली आहे. दोन्ही देशांमधील या व्यापारयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आणि चिनी चलन युआनमध्ये घसरण झाली आहे.

कॅनडा, मेक्सिकोवरील शुल्क टाळला

कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याचा निर्णय 30 दिवसांसाठी टाळण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लाउडिया शिनबाम यांच्याशी चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रुडो आणि शिनबाम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक राहिली. दोन्ही देशांनी अमेरिकेसोबतची सीमा सुरक्षित करण्यावर सहमती व्यक्त केली असल्याचे सांगत ट्रम्प यांनी आयात शुल्क रोखण्याशी निगडित कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोच्या उत्पादनांवर 25 टक्के तर चीनच्या उत्पादनांवर 10 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता कॅनडा आणि मेक्सिकोसंबंधीचा निर्णय रोखण्यात आला आहे.

सीमा सुरक्षेत गुंतवणूक

ट्रम्प यांच्या निर्णयानंतर ट्रुडो यांनी शुल्काला स्थगिती देण्याच्या बदल्यात कॅनडा सीमा सुरक्षेत मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच संघटित गुन्हेगारी, फेंटेनाइलची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगला हाताळण्यासाठी दोन्ही देश मिळून कॅनडा-युएस जॉइंट स्ट्राइक फोर्स तयार करणार आहेत. याचबरोबर कॅनडा फेंटेनाइल जार (फेंटेनाइलची तस्करी रोखणारा अधिकारी) नियुक्ती देखील करणार आहे. तस्करीत सामील कार्टेलला (समूह) दहशतवादी समुहांच्या यादीत सामील केले जाईल अशी माहिती ट्रुडो यांनी दिली आहे. ट्रुडो यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे.

मेक्सिकोचा विजय

मेक्सिकोच्या अध्यक्ष शिनबाम यांनी एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांच्या निर्णयाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत शिनबाम यांचे कौतुक करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी स्वत:चा निर्णय बदलणे म्हणजे मेक्सिकोचा विजय असल्याचे उद्गार शिनबाम यांनी काढले आहेत. ट्रम्प यांच्यासोबत 35-40 मिनिटांपर्यंत चर्चा झाली. अमेरिकेतून मेक्सिकोत धोकादायक शस्त्रांच्या पुरवठ्यावरूनही शिनबाम यांनी या चर्चेदरम्यान तक्रार केली.  ही शस्त्रास्त्रs गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती लागली असल्याने त्यांचे बळ वाढले आहे. अमेरिकेने अशाप्रकारची शस्त्रास्त्रs पुरविण्यावर स्थगिती देण्यासाठी काम करावे. मेक्सिकोसोबतची अमेरिकेची व्यापारी तूट कमी व्हावी अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. आम्ही वाणिज्यिक भागीदार आहोत असे ट्रम्प यांना सांगितले असल्याचे शिनबाम यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.