सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण, हरित उपक्रम राबवा!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
पर्यावरण संतुलन राखण्यात खासगी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून बांधकाम क्षेत्राने सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण व हरित उपक्रम राबवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या महासंघातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी क्रेडाईचे वरिष्ठ अधिकारी, विविध संबंधित सरकारी खात्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने हरित पट्ट्यांसाठी क्रेडाईच्या माध्यमातून उपक्रम हाती घेणे या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला. एनएसडीएलच्या सहकार्याने कुशलतेचा विकास व प्रशिक्षण, तसेच कामगारांना अधिक रोजगारसंधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम राबवण्याचे ठरविण्यात आले.
बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध असलेला ‘कल्याण निधी’ त्यांच्या आरोग्य, निवास आणि सामाजिक सुरक्षेसाठी वापरण्यावर भर देण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका घर’ या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बांधकाम उद्योगाचा सकारात्मक सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण, रोजगार आणि सामाजिक कल्याण या तिन्ही बाबतीत बांधकाम व्यावसायिकांनी जबाबदारीने भूमिका पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.