For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

’धरती माता बचाओ‘ अभियान राबवा

01:06 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
’धरती माता बचाओ‘ अभियान राबवा
Advertisement

कृषी सहसंचालक कार्यालयात खतविक्रेत्यांची बैठक : शेतकऱ्यांना भीती न बाळगण्याचे आवाहन :खतांचा गैरवापर-साठेबाजी रोखणार

Advertisement

बेळगाव : आगामी खरीप हंगामात खतांचा पुरवठा सुरळीत राहावा, या उद्देशाने बेळगाव तालुक्मयातील सर्व खतविव्रेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी कृषी सहसंचालकांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत सुमारे 95 खत विव्रेते तसेच विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यासोबतच ग्रामपंचायतस्तरावर ‘धरती माता बचाओ’ अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापराबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

बैठकीत सध्या जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगू नये. तसेच आगाऊ खत खरेदी करून अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या क्षेत्रानुसार युरिया खत उपलब्ध व्हावे, यासाठी यंदा संगणकीय अॅपच्या माध्यमातून युरिया वितरण करण्याची सूचना सरकारने दिली आहे. त्यामुळे खतांचा गैरवापर व साठेबाजी रोखता येणार असून शेतकऱ्यांना गरजेनुसार खत मिळणार आहे.

Advertisement

मातीचे मृदास्वास्थ्य सुधारण्यासाठी आणि पोषकद्रव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी रायझोबियम, अझिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम आणि पीएसबी यांसारख्या सेंद्रिय खतांच्या वापराला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात द्यावे. जिल्ह्यात उपलब्ध असलेली खते इतर जिल्हे किंवा राज्याला वळवू नयेत. तसेच हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा ठेवावा. खतांच्या काळाबाजारावर नजर राहणार असून खतविक्रेत्यांनी यासाठी सहकार्य करावे. पोटॅश खतांच्या वापरालाही प्रोत्साहन देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यावेळी कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, चिकोडीचे उपसंचालक सलीम संगत्रास, सहदेव यरगोप्प, साहाय्यक संचालक महादेव पटगुंदी, अल्ताफ हुसेन, विजयकुमार, सी. आय. हुगार, बसवराज आदी उपस्थित होते.

खबरदारी घेण्यात यावी

खतांचा नियमित आणि अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दररोज पीओएस प्रणालीचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच शेतीसाठी असलेली खते प्लायवुड, पशुखाद्य आदी उद्योगांकडे वळविली जाणार नाहीत, याची खबरदारीही घेण्यात यावी. युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरिया, अमोनियम सल्फेट आदींचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला. तसेच भाजीपाला व फळबागांमध्ये डीएपी खताच्या वापरावर निर्बंध घालून कॉम्प्लेक्स खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.