प्रधानमंत्री 15 कलमी योजना समर्पकपणे राबवा
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अंमलबजावणी, आढावा बैठकीत सूचना : गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस
प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेली प्रधानमंत्री 15 कलमी योजना समर्पकपणे राबवून नागरिकांना याचा लाभ करून द्यावा. वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, अल्पसंख्यांकांना शिक्षण, कौशल्य आणि इतर उद्योगांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी आयोजित प्रधानमंत्री 15 कलमी योजना अंमलबजावणी व आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध खात्याकडून लाभार्थ्यांना योजनेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. स्थानिक आमदार आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात यावेत. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला व्यापक प्रचार मिळणार आहे. याबरोबरच पालकमंत्र्यांच्या जनस्पंदन कार्यक्रमांतर्गतही या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनांपासून नागरिक वंचित
बागायत खात्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोकांपर्यंत योजना पोहोचत नसल्यामुळे नागरिकांना याचा लाभ होत नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. नियोजित वेळेमध्ये उद्दिष्ट गाठावे, अशी सूचना आमदार राजू सेठ यांनी केली.
30 अल्पसंख्यांक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध
मत्स्य खात्याकडून अल्पसंख्यांक लाभार्थ्यांना मासे पकडण्यासाठी जाळी व इतर साहित्य पुरविण्यात आली असल्याची माहिती दिली. औद्योगिक प्रशिक्षण उद्योग खात्याकडून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 30 अल्पसंख्यांक तरुण व तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण खात्याकडून देण्यात आली.
येथील महिला आणि पुरूषांना आयटीआय महाविद्यालयांमध्ये आरक्षणानुसार प्रवेश दिला जात आहे. अर्ज करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. महिला आयटीआयमध्ये आतापर्यंत 8 मुस्लीम आणि 13 जैन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक विकास निगमकडे अनेक अर्ज आले आहेत. स्थानिक आमदारांना माहिती द्यावी. विविध योजनांसाठी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
डे नल्म योजनेंतर्गत अल्पसंख्यांकांना विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. बँकेकडे दाखल करण्यात आलेले अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. चार अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती मनपाने अधिकाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांना कर्ज सुविधा
डीसीसी बँकेच्या माध्यमातून 4 एकर शेती जमीन ओलिताखाली असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याजदराने ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्यात येणार आहे. 5 लाखांपर्यंत शून्य व्याजदाराने पीककर्ज देण्यात येत आहे, अशी माहिती डीसीसी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक कलंदार यांनी दिली. सहकार खात्यातून जिल्ह्dयातील 53 अल्पसंख्यांकांना दीर्घ कालीन कर्ज देण्यात आले आहेत. पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत कर्ज देण्यात आले आहे, अशी माहिती सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. पशुसंगोपन खात्याकडून मुख्यमंत्री अमृत जीवन योजनेंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी यापूर्वीच मदत देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.