जुनी पेन्शन योजना लागू करा
कोल्हापूर :
सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करा. संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला शासन निर्णय रद्द करा. विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान द्या, यासह अन्य मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दनाणून गेला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक जाहीर करा. खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिध्द करा, सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण रद्द करा, सरकारी विभागांचे संकोचीकरण तात्काळ थांबवा. जाचक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षकाला अशैक्षणिक कामे तसेच ऑनलाईन कामे देवू नका. कुठल्याही कारणास्तव शासनाच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नका, शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका. 1 नोव्होंबर 2005 पुर्वी विनाअनुदान, अंशत: अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा. चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा. पेन्शन विक्री केलेल्या सेवानिवृत्तांना 15 ऐवजी 12 वर्षानंतर पूर्ण पेन्शन चालू करा. खासगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना पूर्वीप्रमाणे रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा. महापालिका क्षेत्रातील खासगी अनुदानीत प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना शासनाकडून 100 टक्के मेडिकल बिलाचा लाभ मिळावा. यासह अन्य मागण्यासाठी शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी यावेळी निमंत्रक अनिल लवेकर, शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहूल पोवार, सचिव आर. वाय. पाटील, दादासाहेब लाड, सुधाकर सावंत, महादेव डावरे, संतोष आयरे, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, राहूल शिंदे, अंकुश रानमाळे, नितीन कांबळे, सतीश ढेकळे, विठ्ठल वेलणकर, दिलीप शिंदे, शरद गोलाईत, ज्ञानेश्वर हजारे, अनिल कांबळे, विशाल वाघेला, सागर पालवे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.