पाणीसमस्येवर मात करण्यासाठी अटल भू-जल योजना राबवा
नागरिकांची मागणी, योजनेकडे दुर्लक्ष
बेळगाव : यंदा डिसेंबरपासूनच काही ठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अटल भू-जल योजना अधिक सक्रियपणे राबवावी, अशी मागणी होत आहे. सामान्य जनतेला मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ही योजना अमलात आणण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त या योजनेची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ही योजना कागदावरच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. भू-जलाची कमतरता, प्रदूषण आणि इतर बाबींचा विचार करून पाणी कमी असलेल्या भागात ही योजना राबविण्यात येणार होती. त्यामुळे सद्यपरिस्थितीत काही भागात पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही होत आहे. या योजनेंतर्गत 50 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम जागतिक बँकेकडून अदा केली जाणार आहे. मात्र, योजनाच प्रत्यक्षात अंमलात आली नसल्याने निधी देखील थांबला आहे.
पाण्याचा नवीन स्रोत निर्माण करणे योजनेचा उद्देश
विशेषत: भू-जल पातळी वाढवून पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे हाही या योजनेचा उद्देश आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाची हानी झाली आहे. त्याबरोबर जलाशय, नदी, नाले आणि तलावांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीसमस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी अटल भू-जल योजना राबविणे गरजेचे आहे. या योजनेंतर्गत शेतीला पाणी देण्याचा देखील उद्देश होता. मात्र, सद्यपरिस्थितीत शेतीला तर सोडाच पिण्याचे पाणी देखील या योजनेंतर्गत मिळेनासे झाले आहे. शिवाय स्थानिक पातळीवर या योजनेची जागृती व्हावी यासाठी संवादात्मक कार्यक्रम राबविले जाणार होते. मात्र, या सगळ्यांनाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे.