मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करा
बाळंतिणींच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर : सोशॅलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडियाची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात बाळंतिणींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपचारांअभावी मृत्यू होत असल्याने ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत नवीन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करून सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी सोशॅलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडिया व अखिल भारत रयत कृषक कामगार संघटना यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मागील महिन्याभरात तीन बाळंतिणींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गर्भवती आणि बाळंतिणींच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. त्याचबरोबर शहरातील आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव आहे.
त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. उपचार, औषधांसाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. तर काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर सुविधांचा अभाव आहे. बेळगाव शहरात स्थानिक रुग्णांसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातीलही रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. यासाठी मागील सरकारच्या काळात उद्घाटन करण्यात आलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजू गाणगी, लक्काप्पा बिजण्णावर यांसह विविध पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.