तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्याची घरावर धाड : कोट्याधीची लूट
प्रतिनिधी / संकेश्वर
बुगटेआलूर येथील रहिवासी असणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या अक्षय सुरेश लोहार (वय 32) याने झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात चक्क तोतया प्राप्तिकर अधिकारी बनत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर धाड टाकली. त्यात त्याने कोट्यावधी रुपयांची लूट केली. त्याच्या या कारनाम्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी, संकेश्वर पोलीस स्थानकात 18 सप्टेंबर रोजी बुगटेआलूर येथील अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. सदर फिर्याद त्याचे वडील सुरेश नामदेव लोहार यांनी दिली होती. याविषयी अधिक माहिती देताना संकेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी म्हणाले, 14 सप्टेंबर रोजी घटनेतील मुख्य सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे (मूळचा जयसिंगपूर, सध्या राहणार घाटकोपर, मुंबई), आदित्य मोरे (रा. रुकडी, ता. हातकणंगले), शकील गौस पटेल (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), दीक्षा राष्ट्रपाल भोसले (रा. चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (रा. कोल्हापूर), साई दीपक मोहिते (रा. पाचगाव, ता. करवीर) व अक्षय सुरेश लोहार (रा. बुगटेआलूर, ता. हुक्केरी) यांचा या लूटीमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. घटनेतील तपासात अक्षय सांगली पोलिसांना शरण गेला असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. परिणामी संकेश्वर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची केलेली फिर्याद हा विषय चांगलाच चर्चेला आला आहे.