तोतया पत्रकार शशिकांत कुंभार जेरबंद
पाच दिवसांची पोलीस कोठडी
कोल्हापूर
प्लास्टिक व्यापाऱ्याच्या विरोधात बातमी लावण्याची धमकी देऊन 3 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दोन महिन्यापासून पसार असणाऱ्या तोतया पत्रकारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. शशिकांत शामराव कुंभार (वय 51 रा. बापट कॅम्प) असे अटक केलेल्या संशयिताचे नांव आहे. रविवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यापारी सनी दर्डा याला विरोधात बातमी लावून कारवाई करण्याची धमकी दिल्याचा प्रकार 7 ऑक्टोंबर 2024 रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सुत्रधार अन्सार मुल्ला याच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर या प्रकरणी 6 जणांना अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अन्सार मुल्ला, शशिकांत कुंभार, सागर चौगुले, अजय सोनुले हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होते. त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. या चौघांचेही अटकपूर्व जामिनअर्ज न्यायालयाने फेटाळले होते. यानंतरही या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 29 नोव्हेंबर रोजी या चौघांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने या चौघांचेही जामिन अर्ज फेटाळले. यानंतर शशिकांत कुंभार याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
2 महिन्यांपासून पसार
7 ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अन्सार मुल्ला, शशिकांत कुंभार, सागर चौगुले, अजय सोनुले हे पसार झाले हेते. अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र दोनही ठिकाणी या चौघांचे जामिनअर्ज फेटाळण्यात आले.