बागा-कळंगुट येथील तोतया आएएस अधिकारी गजाआड
प्रतिनिधी/ म्हापसा
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून कळंगुटमधील व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या संशयित मनोजकुमार (31, मूळ रायपूर- छत्तीसगढ) या अभियंत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला संशयित मनोज कुमार हा 5 डिसेंबर रोजी उमटावाडा-कळंगूट येथील लंबाना रिसॉर्टमध्ये उतरला होता. येथून त्याने एक टॅक्सी भाड्याने घेतली. टॅक्सी चालकास त्याने आपण ओडिशास्थित आयएएस अधिकारी असून लवकरच आपली गोव्यात बदली होईल, असेही सांगितले. काही दिवसांनंतर तो गोव्यातून आपल्या मूळ गावी परतला. पुढे 20 डिसेंबर रोजी मैत्रिणीसोबत हॉटेलवर उतरला. त्याने पुन्हा सदर टॅक्सी चालकास कॉल करुन आपण गोव्यात आल्याची माहिती दिली.
26 डिसेंबर रोजी 1.20 वाजता तो टॅक्सीमधून कळंगूट येथील पार्किंगमध्ये आला. त्याने येथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. ओळखपत्र दाखवून पोलिसांना आपल्यासोबत येण्यास सांगितले. हे पोलिस कळंगुट परिसरात सेवा बजावत होते. कळंगुटमधील काही ठिकाणी पाहणी करायची असल्याचे सांगत काही पोलिसांना आपल्यासोबत येण्याचा आदेश दिला. पोलिस संशयितासोबत गेले. सर्वप्रथम सदर व्यक्तीने बागा येथील दोन शॅक व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याची ताकीद
दिली. यानंतर त्याने पोलिसांना घेऊन बागा येथील टीटोज लेन गाठले. येथे देखील त्याने क्लब व्यावसायिकांना रात्री उशिरापर्यंत आस्थापने सुरू ठेवून मोठ्याने संगीत वाजवल्याबद्दल ताकीद दिली. व्यवसाय बंद न केल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल असेही सांगितले. यानंतर या व्यक्तीने सर्व पोलिसांना त्यांच्या तैनातीच्या ठिकाणी सोडले व स्वत: हॉटेलवर परतला.
याप्रकरणी काहीतरी काळेबेरे असल्याचे लक्षात येताच कळंगुट पोलिस स्थानकाशी संलग्न कॉन्स्टेबल नारायण नरसे (45) यांनी भा. न्या. सं च्या 318, 204, 132, 205, 319, 308 (6) या कलमान्वये बोगस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला. येथील व्यावसायिकांना गंभीर गुह्यांमध्ये अडकवण्याची धमकी
देत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काल रविवार 29 डिसेंबर रोजी सकाळी मनोज कुमार यास अटक करण्यात आली.