अभेद्य दगड...
या जगात अनेक आश्चर्ये असून त्यांच्या मागचे वैज्ञानिक कारणही कित्येकदा अज्ञात असते, अशी स्थिती आहे. जगातील सात महत्वाची आश्चर्ये आपल्याला माहित असतात. पण त्यांच्या पलिकडेही अनेक अशी स्थाने किंवा वस्तू जगात आहेत, की ज्यांच्यामुळे आपण थक्क होण्यापलिकडे दुसरे काही करु शकत नाही.
आपल्या भारतातही अशी अनेक गूढ आश्चर्ये आहेत. मध्यप्रदेशातील खरगाव हे असे एक गाव आहे, की जेथे अनेक अनाकलनीय घटना घडत असतात. या गावात अनेक रहस्यमय स्थाने आहेत. त्यांच्यापैकी एक नर्मदा नदीच्या तटावर एका पहाडावर स्थित आहे. या पहाडावर मातीत अर्धवट गाडले गेलेले अनेक दगड आहेत. या दगडांमध्ये एक असा आहे, की जो त्याच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे इतर सर्व दगडांमध्ये उठून दिसतो. हा दगड इतका बळकट आहे, की त्याच्यावर छिन्नी किंवा हातोडा यांचा काहीही परिणाम होत नाही. या साधनांचा उपयोग केला, तरी हा दगड फुटत नाही. त्याचे साधे टवकेही उडत नाहीत.
या दगडाचे इतकेच वैशिष्ट्या नाही. तर या दगडावर जर घाव घातले, तर एक विशिष्ट ध्वनी येतो. लोखंडावर लोखंड आदळल्यासारखा हा ध्वनी असतो. तो ध्वनी 20 फूट अंतरापर्यंत ऐकू जाईल, इतका मोठा असतो. या दगडाच्या आसपास ज्या शिळा किंवा खडक आहेत, त्यांच्यावर आघात केल्यास असा ध्वनी निर्माण होत नाही. तसेच आजूबाजूचे इतर दगड घाव घातल्यानंतर अभेद्य रहात नाहीत. इतका बळकट आणि असा ध्वनि निर्माण करणारा हा दगड या प्रदेशात आला कसा आणि कोठून, याचे उत्तर निदान आजमितीला तरी अज्ञात आहे. यासंबंधी तज्ञांचे संशोधन होत आहे. तथापि, अद्यापही हा प्रश्न अनुत्तरितच आहे.