जागतिक युद्ध तणावात शेअरबाजारात विक्रीचा प्रभाव
सेन्सेक्स 383 अंकांनी तर निफ्टी 118 अंकांनी नुकसानीत , आयटी निर्देशांक घसरणीत
वृत्तसंस्था, मुंबई
पश्चिम आशियातील अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे शेअर बाजार पुन्हा एकदा सोमवारी घसरणीत राहिला होता. सेन्सेक्स 382 अंकांनी तर निफ्टी 118 अंकांनी घसरुन बंद झाला होता. आयटी समभागांमध्ये कमजोरी पाहायला मिळाली.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 382 अंकांनी घसरुन 76,132.81 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी देखील 118.55 अंकांनी घसरून 23,779.15 अंकांवर बंद झाला. स्मॉल कॅप क्षेत्रात काही प्रमाणात तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 अर्ध्या टक्क्याने घसरला.
आयटी, मेटल, रिअल्टी आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रांनी बाजारावर इतका दबाव टाकला की तो सावरू शकला नाही. फार्मास्युटिकल क्षेत्राने हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हा निर्देशांक फक्त अर्ध्या टक्क्याहून अधिक वाढला. निफ्टी मेटल, निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी पीएसयू बँक हे निर्देशांकसुद्धा प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरलेले पाहायला मिळाले.
निफ्टीत 50 पैकी 37 समभाग हे घसरुन तर 13 समभाग तेजीसोबत बंद झाले. यात इन्फोसिस 3.76 टक्के, एसबीआय लाइफ 2.4 टक्के व टेक महिंद्रा 2.4 टक्के इतके नुकसानीसह बंद झाले. तर दुसरीकडे अपोलो हॉस्पिटल 1.27 टक्के तेजीसह बंद होताना दिसला. यासोबत आयशर मोटर्स 1.04 टक्के व सिप्ला समभाग 0.74 टक्के इतका वाढत बंद झाला होता. सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 30 शेअर्सपैकी केवळ 7 शेअर्स वधारले तर उर्वरीत 23 समभाग नुकसानीसोबत बंद झाले. एल अँड टी, एअरटेल आणि मारुती सर्वाधिक वाढीसह बंद झाले. बीएसईवर सूचीबद्ध असणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4 सप्टेंबर 2026 रोजी 4,89,74,677.41 कोटी रुपये होते. 7 सप्टेंबर 2026 रोजी ते घसरून 4,86,61,742.02 कोटी रुपये झाले. याचा अर्थ सोमवारी गुंतवणूकदारांच्या भांडवलात 312,935.39 कोटींची घट झाली.
जागतिक बाजारावर नजर टाकल्यास दक्षिण कोरीयाचा कोस्पी 4.61 टक्के वाढत 6995 अंकांवर कार्यरत होता. तर जपानच्या निक्केई 2.12 टक्के तेजीसह 66400 अंकांवर बंद झाला होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.93 टक्के इतका घसरणीत होता. 4 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील बाजारात घसरण होती. डोव्ह जोन्स 0.51 टक्के व नॅसडॅक 0.29 टक्के व एस अँड पी 500 0.38 टक्के घसरणीत होता.