साखर कारखान्यांवर महाराष्ट्र निवडणुकीचा परिणाम
ऊसतोडणी कामगारांची टंचाई; ऊस उत्पादक अडचणीत : यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता
बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा परिणाम बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर झाला आहे. ऊसतोडणी कामगारांअभावी गळीत हंगाम ट्रॅक्टर मालक आणि ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत. आधीच अतिवृष्टीचा ऊस उत्पादकांना फटका बसला आहे. त्यातच ऊसतोडणी लांबणीवर पडण्याची चिंता व्यक्त होत आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातील ऊसतोडणी कामगार ऑक्टोबर दरम्यान बेळगाव जिल्ह्यात दाखल होत होते. मात्र यंदा महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे नोव्हेंबर उजाडला तरी अद्याप ऊसतोडणी कामगार दाखल झाले नसल्याचे दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यात 16 साखर कारखाने आहेत. या सर्व साखर कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांच्या माध्यमातून उसाचा पुरवठा केला जातो. मात्र कामगारच दाखल झाले नसल्याने ऊसतोडणी थांबली आहे.ऊसतोडणी कामगारांना आगाऊ रक्कम दिली जाते. त्यानंतर कामगार उसाची तोडणी करतात.
एका टोळीमध्ये 10 ते 15 कामगार असतात. मात्र सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे यंदा ऊसतोडणी कामगार निवडणुकीनंतरच उसाच्या फडात दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी ऊसतोडणी लांबणीवर पडणार आहे. शेतकऱ्यांनी वाढीव एफआरपी मिळावी यासाठी आंदोलन छेडले होते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला उशीर झाला आहे. आता जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगामाला प्रारंभ केला आहे. मात्र ऊसतोडणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील बीड, जालना, नांदेड, परभणी आदी ठिकाणांहून येणारे कामगार अद्याप दाखल झालेले नाहीत. निवडणूक नोव्हेंबर अखेरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला जोर येणार आहे. महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांना निवडणुकीनंतरच ऊसतोडणीला जाण्याची विनंती स्थानिक पातळीवर केली जात आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार बेळगाव जिल्ह्यात डिसेंबरमध्येच दाखल होतील.