इराण-इस्रायल संघर्षाचा शेअरबाजारावर प्रभाव
सेन्सेक्स 138 अंकांची घसरण : गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचे नुकसान
मुंबई :
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. गुंतवणूकदार सावध होते. अपेक्षित असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे.
बुधवारी सेन्सेक्स 81,314 वर उघडला मात्र सेन्सेक्स दिवसअखेर 138.64 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 0.17 टक्क्यांसह 81,444.66 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 41.35 अंकांच्या किंचित घसरणीसह 24,812.05 वर बंद झाला. दरम्यान निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरला आणि निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकही 0.5 टक्क्यांनी घसरला. सर्व विभागांमध्ये विक्रीमुळे बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रात 448 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 446 लाख कोटी रुपयांवर घसरले. यामुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात 2 लाख कोटी रुपये गमावले.
निफ्टीत इंडसइंड बँक वधारला असून तो 5.12 टक्क्यांनी वाढला. त्यानंतर ट्रेंटमध्ये 1.93 टक्के वाढ, टायटन कंपनीमध्ये 1.83 टक्के वाढ, मारुती सुझुकीत 1.22 टक्के वाढ, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 1.13 टक्के वाढ झाली. यानंतर अदानी पोर्ट्स 1.42 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 1.35 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.34 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेस 1.19 टक्के घसरले.
जवळजवळ सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. परंतु असे असूनही निफ्टी खासगी बँकेत 0.39 टक्के वाढ झाली आणि निफ्टी ऑटोमध्ये 0.37 टक्के वाढ राहिली आहे. निफ्टी मीडियामध्ये सर्वात जास्त घसरण झाली, जी 1.27 टक्क्यांनी घसरली. त्यानंतर, निफ्टी कॅपिटल मार्केट्स 0.87 टक्के, निफ्टी आयटी 0.83 टक्के, निफ्टी मेटल्स 0.72 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस 0.48 टक्क्यांनी घसरले.