For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीएसटी दर कपातीचा ऑटो क्षेत्रावर परिणाम

06:49 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीएसटी दर कपातीचा ऑटो क्षेत्रावर परिणाम
Advertisement

जीएसटी कपातीला वर्षपूर्ती : लहान कार ते दुचाकींच्या विक्रीत वाढ, ग्रामीण भागाकडे गती

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलाला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र सर्वात मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक ठरले. यामुळे ग्रामीण भागातील विक्रीत मोठी वाढ झाली आणि लहान कारच्या बाजारपेठेतही पुन्हा तेजी आली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (फाडा) मते, लहान गाड्यांच्या विक्रीतील बहुतांश सुधारणा ही ग्रामीण बाजारपेठांमधील उत्तम कामगिरीमुळे झाली आहे.

Advertisement

लहान कार ते दुचाकींच्या विक्रीत वाढ, ग्रामीण भागाकडून ऑटो क्षेत्राला गती जीएसटी दरात कपात झाल्यानंतर एका वर्षाने, देशाच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात, विशेषत: लहान कार आणि दुचाकींच्या विक्रीत ग्रामीण मागणीमुळे विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे.

22 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या या निर्णयामुळे ऑटो क्षेत्राच्या, विशेषत: 350 सीसी क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या लहान कार आणि दुचाकींच्या किरकोळ विक्रीला नवसंजीवनी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्यासाठी जीएसटी दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. मोठ्या गाड्यांवरील भरपाई उपकर (कॉम्पेन्सेटरी सेस) हटवल्यानंतर जीएसटी दर 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आणि 1,800 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरच्याबाबतीत तो 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

सर्व कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ

फाडाचे अध्यक्ष साई गिरीधर म्हणाले, ‘मारुती सुझुकीच्या विक्रीतील वाढ हेच लहान गाड्यांच्या बाजारपेठेने किती चांगली कामगिरी केली आहे याचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे, सर्व कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली. जीएसटीचा निर्णय ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे आणि ही तेजी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती कमी करण्याचा विचार केला पाहिजे.’

जीएसटी दरातील कपातीमुळे गाड्यांच्या किमती कमी झाल्यानंतर जवळपास वर्षभराने, सणासुदीच्या काळात सुरुवातीला आलेल्या तेजीनंतरही वाहनांच्या किरकोळ विक्रीतील ही वाढ कायम आहे. यात दुचाकी-प्रवासी वाहनांची भूमिका महत्त्वाची होती.

वाहन विक्रीत 40 टक्के वाढ

किरकोळ विक्रीत वार्षिक 40.5 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यात दुचाकींची विक्री जवळपास 52 टक्क्यांनी वाढून विक्रमी 31.5 लाख वाहनांवर पोहोचली आणि प्रवासी वाहनांची विक्री विक्रमी 5.57 लाख वाहनांवर पोहोचली. फाडाने दुचाकींच्या विक्रीतील या वाढीचे मुख्य कारण जीएसटी कपात, ग्रामीण भागातील मागणी आणि सणासुदीच्या काळातील खरेदी असल्याचे म्हटले आहे. तसेच, लहान कारवरील कमी करामुळे किमतीबाबत जागरूक असलेल्या पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी खरेदी करणे सोपे झाले आहे.

Advertisement
Tags :

.