अमेरिकेतून स्थलांतरीतांची पाठवणी सुरु
205 बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे विमान भारताकडे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत बेकायदा मार्गाने स्थलांतरीत झालेल्या भारतीयांच्या परत पाठवणीला अमेरिकेने प्रारंभ केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे एक विमान 205 अवैध भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे मंगळवारी पाठविण्यात आले. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातून हे विमान पाठविण्यात आले आहे.
या सर्व भारतीयांची भारतीय अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असून या प्रक्रियेनंतरच त्यांना अमेरिकेतून भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेतील तसेच इतर देशांमधील अशा बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत घेण्यास भारताची संमती आहे, असे परराष्ट्र व्यवहार विभागाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. अमेरिकेत साधारणत: 18 हजार अवैध भारतीय स्थलांतरित आहेत, अशी माहिती या संदर्भात देण्यात आली असून या सर्व स्थलांतरितांची पूर्णत: तपासणी आणि पडताळणी करुनच त्यांना भारतात परत घेण्यात येईल, असेही आपल्या धोरण असल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
प्रारंभीच्या आदेशांपैकी एक
डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सर्व बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठविण्याची योजना घोषित केली आहे. त्यांनी त्यांचा शपथविधी झाल्यानंतर काढलेल्या पहिल्या आदेशांमध्ये या आदेशाचा समावेश होता. त्यांच्या आदेशावर आता क्रियान्वनय होत असून प्रथम दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाच्या अनेक अवैध नागरीकांना परत पाठविण्यात आले. नंतर एल साल्वेदोर देशाच्या स्थलांतरीतांना मायदेशी धाडण्याची प्रक्रिया हाती घेतली गेली. आता भारताच्या संदर्भातही या प्रक्रियेचे प्रारंभ झाला आहे.
सी-17 विमानाची योजना
भारताच्या 205 बेकायदा स्थलांतरितांना परत पाठविण्यासाठी अमेरिकेने आपल्या सी-17 जातीच्या विमानाची नियुक्ती केली आहे. अमेरिका ते भारत हा प्रवास जवळपास 18 तासांचा आहे. या विमानात प्रवाशांसाठी सुविधा कितपत आहेत, असा प्रश्नही विचारण्यात येत आहेत. तथापि, सर्व व्यवस्था करुनच या विमानातून भारतीय नागरीकांना परत पाठविण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या प्रशासनाने दिले. या सर्व स्थलांतरीतांच्या कागदपत्रांची पाहणी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
काही जणांना अटक होण्याची शक्यता
अमेरिकेतून भारतात परत पाठविण्यात येत असलेल्या अवैध स्थलांतरीतांमध्ये काही आरोपी असल्याची चर्चा आहे. अशा लोकांना ते भारतीय विमानतळावर उतरल्यानंतर त्वरित अटक केली जाऊ शकते. तसेच इतर प्रवाशांचीही कसून तपासणी झाल्यानंतरच त्यांना भारतातील त्यांच्या घरी पाठविले जाईल. त्यांच्या आरोग्याचीही तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.