पीओपी मूर्तींचे घरीच विसर्जन शक्य! आवाहन महापालिका प्रशासनासह पर्यावरण प्रेमींनी केले आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी
शाडूसह कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणेश मूर्तीच घरी बादलीत विसर्जन करता येते असा अनेकांचा समज आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर चळवळ राबविली जात आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीस(पीओपी)पासून बनविलेल्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करणे शक्य आहे. गणेश मूर्ती दान करण्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरीकांनी घरीच विसर्जन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनासह पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
पीओपीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीं अमोनियम बायो कॉर्बोनेटच्या माध्यमातून घरच्या घरी विसर्जन करता येते. एका बादलीमध्ये मूर्तीच्या उंचीनुसार मूर्ती बुडेल इतके पाणी व मूर्तीच्या वजनाइतके अमोनियम बायो कार्बोनेट घ्यावे. लांब काठीने सदर मिश्रण ढवळून घ्यावे. सदर प्रक्रिया सुरू असताना वरच्या भागावर पाण्याचे बुडबुडे तयार होऊन अमोनियम गॅसचा गंध पसरतो. गणेशमूर्तीवरील निर्माल्य व सजावटीच्या वस्तू काढून घेऊन मूर्ती सदर मिश्रणात विसर्जित करावी. सुरुवातीला काही तास पाण्यावर मूर्ती तरंगत राहील व हळूहळू पाण्याच्या तळाशी जाईल.
बादलीवर झाकण ठेवून ती बाजूला ठेवावी व बादलीतील मिश्रण दिवसातून ६ ते ७ वेळा काठीने ढवळावे. साधारणत: ६ ते ७ दिवसांनंतर पीओपीची मूर्ती पूर्ण विरघळून जाते व त्याचे दोन थर तयार होतात. वरचा थर हा अमोनियम सल्फेट असतो. ते उत्तम प्रकारचे खत असते. या खताचा वापर घरातील झाडांसाठी वापरता येऊ शकतो. अमोनियम बायो कार्बोनेट बाजारात सहज उपलब्ध आहे. या तंत्राचा वापर करुन पीओपी मूर्तींचे विसर्जन घरीत करुन पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करावा अस अवाहन करण्यात आले आहे.