उचगाव परिसरातील गणरायांचे रात्री उशिरापर्यंत विसर्जन
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरामध्ये शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशे, धनगरी ढोल आणि भंडाऱ्याची उधळण करत युवक, पुरुष, महिला व युवती यांच्यासह गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... गजरामध्ये रात्री उशिरा सार्वजनिक गणपती बाप्पांना अकरा दिवसाच्या उत्सवानंतर अखेरचा निरोप देण्यात आला. गुलालाची आणि भंडाऱ्याची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करत या भव्य मिरवणुका गावोगावी गल्लोगल्लीमधून निघून विसर्जनस्थळी पोहोचत असल्याचे चित्र रात्री दीड दोनपर्यंत दिसून आले.
गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून रिमझिम पावसाला प्रारंभ झाला होता. मात्र गणेश बाप्पांना निरोप देतेवेळी पावसाने पूर्ण विश्रांती घेऊन भक्तांचा आनंद द्विगुणीत केल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला.तर दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झाले. सार्वजनिक गणपती तसेच घरगुती गणपतीसुद्धा मार्कंडेय नदीवरील मार्कंडेय तीर्थक्षेत्रावर विसर्जन करण्यात आले. मात्र सार्वजनिक गणरायांच्या मोठ्या मुर्त्या उचगावच्या पूर्व भागात असलेल्या तलावामध्ये क्रेनच्या सहाय्याने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. उचगाव ,बसुर्ते, कल्लेहोळ, सुळगा, तुरमुरी, बाची या गावातील घरगुती गणेशमूर्तीपासून ते सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. मार्कंडेय तीर्थक्षेत्र तसेच या तलावाच्या विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती.