Sangli News : अजितदादांच्या अस्थिंचे हरिपूर संगमात विसर्जन
हरिपूर येथे कृष्णा–वारणा संगमावर अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. सायंकाळी अस्थिंचे विधिवत पूजन करून हरिपूर येथे कृष्णा-वारणा संगमावर विसर्जन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांचाअस्थिकलश सांगली आणला. येथील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, आ. इद्रिस नायकवडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ. दिनकर पाटील, राष्ट्रवादी शरद पवारपक्षाचे जिल्हा निरीक्षक शेखर माने, राष्ट्रवादीचे मनपातील गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, अतहर नायकवडी, अभिजीत भोसले यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
सकाळी दहा ते सायंकाळी साडे वाजेपर्यंत अस्थिदर्शनासाठी कार्यालयात गर्दी होती. सायंकाळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदी संगमावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन केले. यावेळी मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.