कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने १५ हजार गणेश मुर्तीचे विसर्जन ! गतवर्षीच्या तुलनेत विसर्जन संख्येत दुपटीने वाढ
कोल्हापूर प्रतिनिधी
घरगुती गणेशमुर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने इराणी खणीवर स्वयंचलित यंत्र (कन्व्हेअर बेल्ट) ची व्यवस्था करण्यात आली होती. या बेल्टच्या सहाय्याने यंदा सुमारे 15 हजार 911 गणेश मुर्तींचे थेट इराणी खणीमध्ये विसर्जन करण्यात आले. गतवर्षी या यंत्राच्या सहाय्याने 8 हजार 300 मुर्ती विसर्जीत करण्यात आल्या होत्या.
महापालिकेच्यावतीने घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन थेट इराणी खणीमध्ये करण्यासाठी स्वयंचलित यंत्र 2022 मध्ये बसविण्यात आले. 83 लाख रुपये खर्च करुन हे यंत्र महापालिकेच्या वतीने खरेदी करण्यात आले होते. पहिल्या वर्षी या मशीनला थंडा प्रतिसाद मिळाला होता. मात्र 2023 मध्ये महापालीकेच्या वतीने मशीनच्या फौंडेशनसाठी 7 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर या यंत्राद्वारे जवळपास 8 हजार 300 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा हाच आकडा सुमारे 15 हजार 911 पर्यंत पोहोचला. विसर्जन कुंडामध्ये संकलित झालेल्या गणेशमुर्त्यांसोबतच नागरीकांनीही या मशिनद्वारे विसर्जन करण्यास प्राधानय दिले.
स्वयंचलित यंत्रामुळे मनुष्यबळावरील ताण कमी
महापालिकेने 2022 मध्ये हे स्वयंचलित यंत्र पुणे येथील कंपनीकडून खरेदी केले. यापूर्वी महापालिकेकडे संकलित झालेल्या गणेशमुर्ती संकलित करुन त्या मनुष्यबळाचा वापर करुन खणीमध्ये विसर्जीत केल्या जात होत्या. याला दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात होता. मात्र या यंत्रामुळे त्याचदिवशी मुर्ती खणीमध्ये विसर्जीत केल्या जाण्यास मदत होत आहे.