इराणी खणीत 1014 मंडळांच्या पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन
घरगुती 1078 मूर्ती विसर्जित : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अखंड 24 तास परीश्रम, सुरक्षितपणे विसर्जन करण्यासाठी चार क्रेन, स्वयंचलित यंत्रणा सक्रीय
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेने केलेल्या नेटक्या नियोजनात शहर व परिसरातील मिरवणूकीने वाजत-गाजत आलेल्या सार्वजनिक गणेशमूर्तीचे इराणी खणीत पर्यावरणपुरक विसर्जन करण्यात आले. विना व्यत्यय व सुरक्षितपणे विसर्जन कार्य व्हावे, यासाठी 75 हमाल बांधवांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे मिळून 1000 कर्मचाऱ्यांनी अखंड 24 तास परीश्रम घेतले. या कालावधीत तब्बल 1014 मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती तर 1078 घरगुती व लहान मंडळांच्या गणेशमूर्ती पर्यावरणपुरक विसर्जन झाले. संपूर्ण विसर्जन कार्य समाधानकारक व्हावे, मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, याचीही विशेष खबरदारी घेत इराणी खणीत चार क्रेन आणि स्वयंचलित यंत्रणा तैनात ठेवली होती. या क्रेनच्या सहाय्याने अगदी अलगद गणेशमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जन पाहण्यासाठी गणेशभक्त तर सकाळपासून ते शुक्रवार पहाटेपर्यंत खणीला घेराव घालून उभे होते. 9 फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी 10 तराफ्यांची व्यवस्था केली.
विसर्जन कार्याला सकाळी सुऊवात झाल्यापासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविंकात आडसुळ यांच्यासह उपायुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहरअभियंता हर्षजीत घाटगे हे इराणी खणीवर लक्ष ठेवून होते. याचबरोबर इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर तब्बल 76 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच होता. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून मंडळांनी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणूकींना सुऊवात केली होती. काही मंडळांनी तर बारा वाजून 5 मिनिटांची वेळ पकडून इराणी खणीत सुऊ केलेले गणेशमूर्तींचे विसर्जन गुऊवारी पहाटेपर्यंत सुऊ होते. गुऊवारी सकाळी सुबराव गवळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे पुजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक अस्ते कदम इराणी खणीकडे विसर्जनासाठी प्रयाण करत होती. हमाल बांधवांसह महापालिकेच्या क्लास-वन व क्लास टूचे अधिकारी, कर्मचारी विसर्जनासाठी सर्व तयारीनिशी सज्ज होते. विसर्जनावर देखरेख देण्यासाठी खणीजवळ कक्षही उभारला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत 73 गणेशमूर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन खणीत झाले. उन्ह-पावसाच्या खेळात व्यत्यय झुगाऊन देत पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर मिरवणूकीने आलेल्या मंडळांनी खणीकडे वेगाने कुच केली. त्यामुळे सायंकाळी तब्बल 567 गणेशमूर्तींचे विसर्जन खणीत झाले.
विसर्जनावेळी गणेशमूर्तीला इजा होऊ नये, म्हणून चार मोठ्या क्रेन सक्रीय ठेवल्या होत्या. या क्रेनला लागूनच मंडळाच्या गणेशमूर्तीचे वाहन लावले जात होते. कार्यकर्ते या क्रेनमध्ये गणेशमूर्ती ठेवत होते. क्रेनमध्ये आरती सोहळा झाल्यानंतर अगदी अलगद गणेशमूर्तीचे विसर्जन खणी केले जात होते. स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातूनही घरगुती व छोट्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सर्वात लक्षवेधी विसर्जन ठरले ते म्हणजे 11 ते 21 फुटी गणेशमूर्ती. अत्याधुनिक क्रेनला बेल्टच्या सहाय्याने गणेशमूर्तीला ती हळूवार खणीत विसर्जित केली जात होती. दुपारच्या सत्रात तीन वेळात उन्ह-पावसाचा खेळ झाला. पण या खेळातही ना विसर्जन मिरवणूक थांबली ना खणीवरील विसर्जन कार्य. सायंकाळी विसर्जन कार्याने मोठा वेग घेतला. प्रत्येक 10 मिनिटाला गणेशमूर्तीचे विसर्जन होऊ लागले होते. गणरायाच्या विसर्जनापूर्वीच्या आरतीने तर खण परिसर दुमदुमून जात होता. विसर्जन पाहण्यासाठी शहर व परिसरातील शेकडो लोक वेळात वेळ काढून इराणी खणीकडे येते. त्यांच्या समोर गुऊवारी सकाळी सुऊ झालेले विसर्जन कार्य शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत अखंडपणे सुऊच राहिले. विसर्जन अगदी नेटक्या पद्धतीने व्हावे, यासाठी महापालिकेचे 1000 कर्मचारी परीश्रम घेत होते. या परीश्रमामुळेच लहान मोठी मंडळे व घरगुती अशा 2092 गणेशमूर्तींचे पर्यावरणपुरक झाले. आरोग्य विभागाकडून खण व परिसरात सातत्याने स्वच्छता केली जात होती. अनुचिच प्रकार घडल्यास तातडीचे उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकही तैनात ठेवले होते . अग्निशमन दलासह व्हाईट आर्मी व महाराष्ट्र रेस्क्यू फोर्सचे आवश्यकत्या साधनसामुग्रीसह खण परिसरावर लक्ष ठेवून होते.
चोख व्यवस्था...
विसर्जन मार्गावर म्हणजेच जुना वाशीनाकापरिसर ते इराणी खणीवर गरजेप्रमाणे लाईटची व्यवस्था केली होती. याचबरोबर विसर्जन कार्य पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची खबरदारी म्हणून इराणी खण व बाजूच्या खणीभोवतीने बॅरेकेटस् लावले होते. तसेच वॉच टॉवरच्या माध्यमातून पोलीस क्षणाक्षणाला लोकांवर लक्ष ठेवून होते.
160 मंडळांच्या व 963 घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन
महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा या विसर्जनस्थळांवर 160 मंडळांनी व 963 घरगुती गणेशभक्तांनी गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्यासाठी 25 कृत्रिम जलकुंड ठेवले होते. सर्व विसर्जनस्थळांवर महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयातील पवडी विभागाचे कर्मचारी सक्रीय होते. त्यांनी मंडळे व घरगुती गणेशभक्तांकडून 35 मेट्रीक टन निर्माल्य स्वीकारले. हे निर्माल्य खत प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यासाठी 10 डंपरचा वापर केला. तसेच सर्वच विसर्जनस्थळांवरून दान स्वऊपात मिळालेल्या गणेशमूर्ती स्वीकारून त्या इराणीकडे नेण्यासाठी 4 ट्रॅक्टर-ट्रॉलीचे व्यवस्था केली होती.
------------
विसर्जन मिरवणूकीत शहर व परिसरातील मंडळे सहभागी झाली होती. अखंड चोविस तास सुऊ राहिलेल्या या मिरवणूकीने इराणी खणीवर गेलेल्या विक्रमनगरातील श्रमिक युवा मित्र मंडळाच्या शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन शुक्रवारी सकाळी 8.15 वाजता करण्यात आले. तत्पूर्वी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते इराणी खणीवर गणेशमूर्तीची निरोपाची आरती करण्यात आली.