अंगणवाडी बीएलओंच्या नोटिसा तातडीने मागे घ्या
सीटूची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : हिंडलगा कारागृह परिसरात नेटवर्क व जॅमरमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मतदार यादीमधील काम करताना अनेक तांत्रिक अडथळे येत आहेत. मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने बीएलओ अंगणवाडी कर्मचारी वैतागले आहेत. त्यातच आता काम अपूर्ण राहिल्यास तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावल्या जातात. त्यामुळे ही समस्या समजून घेऊन तहसीलदारांनी तातडीने या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ (सीटू) बेळगाव तालुका समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
अनेक अंगणवाडी शिक्षिकांना बीएलओवरून मतदार यादी दुरुस्तीच्या कामावर जुंपण्यात आले आहे. मतदार नोंदणीतील दुरुस्ती करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. इंटरनेटची योग्य सुविधा नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी स्वत:च्या मोबाईलचा वापर करीत आहेत. त्यातच हिंडलगा परिसरात जॅमर बसविण्यात आल्यामुळे नोंदणी करताना नेटवर्कची समस्या येत आहे. तहसीलदार कार्यालयाने याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
कारवाई अन्यायकारक
बऱ्याच अंगणवाडी शिक्षिकांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत.त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक असून या विरोधात कर्मचारी संघटनेने आवाज उठविला आहे. त्यामुळे या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात, अंगणवाडी शिक्षिकांना निवडणुकीसाठी पुरेसे प्रशिक्षण द्यावे, नेटवर्क अथवा तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्यास कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी केली. अप्परजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या मंदा नेवगी यांच्यासह इतर सदस्या उपस्थित होत्या.