राज्य औषध नियंत्रकांवरील कारवाई त्वरित मागे घ्या
औषध व्यापारी संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : राज्य औषध नियंत्रक डॉ. उमेश एस. यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी औषध व्यापारी स़ंघटनेने (केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन) केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि. 3 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पाठविल्या आहेत. बळ्ळारी जिल्हा रुग्णालयात 4 बाळंतिणींच्या मृत्यूप्रकरणी राज्य औषध नियंत्रकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे अत्यंत गैर आहे. सरकारी रुग्णालये औषधांसाठी निविदा मागवून अल्पदरात औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कंत्राट देतात. बळ्ळारी रुग्णालयातील बाऴंतिणींच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर व व्यवस्थापनाला जबाबदार धरण्याऐवजी राज्य औषध नियंत्रकांवर कारवाई केली असून हा डॉ. उमेश एस. यांच्यावर घोर अन्याय आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना संघटनेचे सचिव एन. जी. कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.