महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लीज संपलेल्या इमारती तातडीने ताब्यात घ्या

11:36 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अतिक्रमण हटवा, मनपाचे नुकसान टाळा : मनपाच्या सभेत नगरसेवकांची अधिकाऱ्यांना सूचना : पाच जणांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय 

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या इमारती अनेकांनी लीज संपूनही आपल्याच ताब्यात ठेवल्या आहेत. तर काही ठिकाणी या इमारतींमध्ये बेकायदेशीररीत्या विविध व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे मनपाचे मोठे नुकसान होत असून लीज संपलेल्या इमारती महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घ्याव्यात, यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. महापौर सविता कांबळे यांच्यासमोर हा ठराव मांडल्यानंतर साऱ्याच नगरसेवकांनी त्या ठरावाला संमती दर्शविली आहे. महांतेशनगर, अशोकनगर या परिसरामध्ये एनजीओ सुरू करणार असे म्हणून मनपाच्या जागा कब्जात घेतल्या. मात्र, त्या ठिकाणी दुकाने बांधून भाडे घेतले जात आहे. मात्र, यामध्ये महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. कांदा मार्केट येथे महात्मा फुले मार्केट नावाचा फलक लावला जातो. मात्र, मनपाचे अधिकारी त्याविरोधात कोणतीच कारवाई करत नाहीत, हे योग्य आहे का? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी त्याविरोधात जोरदार आवाज उठविला.

Advertisement

सदर जागेचे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. अचानकपणे कोणी तरी फलक लावते. महानगरपालिकेने त्या ठिकाणी स्वत: खर्च करून इमारत उभी केली आहे. मात्र, त्याचे भाडे दुसरेच खात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत महानगरपालिकेचे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी न्यायालयातील प्रक्रियेची माहिती सभागृहात दिली. त्याचबरोबर महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनीही या जागेच्या वादासंदर्भातील माहिती सभागृहात दिली. मात्र, ती योग्यप्रकारे नसल्याचे सांगत त्या जागेची संपूर्ण कागदपत्रे जमा करून योग्यप्रकारे न्यायालयात दाव्याला चालना द्या, असे सांगण्यात आले आहे.

गोवावेस येथील पेट्रोलपंपच्या जागेबाबतही जोरदार आवाज उठविण्यात आला. पूर्वी घेतलेल्या पेट्रोलपंप चालकाने 1 कोटी 42 लाख रुपये भाडे देणे बाकी आहे. असे असताना महानगरपालिका संबंधित चालकावर कोणतीच कारवाई करत नाही, हे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. बीपीसीएल कंपनीने उच्च न्यायालयात त्याविरोधात दावा दाखल केला आहे, अशी माहिती कायदा सल्लागार आणि महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी सभागृहात दिली. पेट्रोलपंपसाठी जागा एकाला दिली होती, असे असताना बीपीसीएल कंपनी दावा का करते? हे योग्य आहे का? सध्या होत असलेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या जागेबाबत तातडीने निर्णय घ्या. सदर जागा खाली करवून घ्या. नवीन टेंडर घेतलेल्या व्यक्तीला जागा ताब्यात द्या, असे सांगण्यात आले. 1 कोटी 42 लाख वसुलीसाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

मनपाच्या 72 इमारतींचे लीज संपुष्टात

महानगरपालिकेच्या एकूण 92 इमारती आहेत. त्यामधील 72 इमारतींचे लीज संपुष्टात आल्याची माहिती महसूल आयुक्तांनी दिली. लीज संपले असताना त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या संबंधित व्यक्ती कशा रहात आहेत? असा प्रतिप्रश्न नगरसेवकांनी केला आहे. आमदार राजू सेठ यांनीही योग्य ती कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाऊल उचलावे, असे सांगितले. विरोधी गटनेते मुजम्मील डोणी आणि नगरसेवक अजीम पटवेगार यांनीही जोरदार आवाज उठविला. सत्ताधारी गटातील नगरसेवकांबरोबरच विरोधी गटातील नगरसेवकांनीही या प्रश्नाच्या विरोधात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

‘त्या’ शाळेच्या इमारतीचा कब्जा लवकर घ्या

टिळकवाडी येथील सुभाष मैदान येथे असलेल्या साळुंखे हायस्कूलच्या इमारतीचे लीज संपले आहे. 2003 मध्येच लीज संपली असून तेव्हापासून शाळा आहे म्हणून सहानुभूती देत आतापर्यंत त्यांना ती इमारत दिली आहे. मात्र, आता ती इमारत ताब्यात घ्या, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. यावर मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी यापूर्वी आम्ही अनेकवेळा नोटिसा दिल्या आहेत, असे सांगितले. महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी शाळा असल्याने आम्ही त्यावर कारवाई करण्याचे टाळले आहे. मात्र, सभागृहातून निर्णय होत असेल तर निश्चितच कारवाई करू आणि ती जागा ताब्यात घेऊ, असे त्यांनी सांगितले. याचवेळी आयुक्तांनीही ती जागा ताब्यात घेण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article