For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ई खाता, कावेरी 2 सॉफ्टवेअरमधील दोष तातडीने दूर करा

11:54 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
ई खाता  कावेरी 2 सॉफ्टवेअरमधील दोष तातडीने दूर करा
Advertisement

क्रेडाई बेळगावची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी

Advertisement

बेळगाव : ई खाता आणि कावेरी 2 सॉफ्टवेअरमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. परंतु हे बदल बिल्डर व डेव्हलपरसाठी डोकेदुखीचे ठरू लागले आहेत. याचा परिणाम महसुलावर देखील होताना दिसत आहे. त्यामुळे ई खाता आणि कावेरी 2 मधील दोष दूर करावेत, अशी मागणी क्रेडाई बेळगावच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. टिळकवाडी, नेहरूनगर, मुजावर गल्ली, फोर्ट रोड, पाटील गल्ली यासारख्या भागामध्ये काही मालमत्ता कायमस्वरुपी भाडेतत्वावर देण्यात आल्या होत्या. शंभर वर्षांपूर्वी भाडेकरारावर घेतलेल्या मालमत्तांवर मूळ मालकांची नावे आहेत. त्यामुळे मुजावर, इनामदार, खतीब, चव्हाण-पाटील या मूळ मालकांच्याच नावे आजही सीटीएसमध्ये नोंदी आढळतात. त्यामुळे मालमत्तांच्या खरेदी-विक्रीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

काही मालमत्ता या पार्टनरशिप तसेच एलएलपी व प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या आहेत. ई आस्थी व कावेरी 2 यामध्ये नोंदणी करताना अडथळे येत आहेत. विक्रीपत्र, करार, गहाणखत यासारख्या जीपीएद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी ओटीपीसह लाईफ सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, जर मालमत्ताधारक इतर शहरांमध्ये असेल तर बऱ्याचवेळा खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले जात आहेत. त्यामुळे ही व्यवस्था आधारबेस्ड ऑथिंटीकेशनच्या माध्यमातून करावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष युवराज हुलजी, सेक्रेटरी प्रशांत वांडकर उपस्थित होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी क्रेडाईला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.