For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | बंद डीपी तत्काल दुरुस्त करुन वीजपुरवठा करा

04:38 PM Jun 17, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   बंद डीपी तत्काल दुरुस्त करुन वीजपुरवठा करा
Advertisement

स्मार्ट मीटर योजनेबाबत मनसेचे महावितरण कार्यालयाला निवेदन

Advertisement

जेऊर : ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, बंद पडलेले डीपी (विद्युत रोहित्र) तत्काल दुरुस्त करावेत तसेच राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेची अंमलबजावणी थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुधनी येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच अनेक ठिकाणी डीपी बंद पडल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या हंगामात वेळेवर वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

Advertisement

यासोबतच स्मार्ट मीटर योजनेबाबतही मनसेने तीव्र आक्षेप नोंदविला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मनसे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींनी दुधनी शाखा अधिकारी गणेश कांबळे आणि कर्मचारी धर्मराज बिराजदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी महावितरण प्रशासनाने शेतकरी व नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन बंद पडलेले डीपी त्वरित दुरुस्त करावेत, नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा आणि स्मार्ट मीटर संदर्भातील जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी शेतकरी संतोष भीमराय मड्डी, सोमलिंग शिवयोगी बिराजदार (बबलाद), लक्ष्मण ईश्वरप्पा कलशेट्टी, नागेश व्होडारी, भीमा माळी, मनसेचे शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, तालुका उपाध्यक्ष प्रविण गड्डद, तालुका उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शाखाध्यक्ष समर्थ नरके (बणजगोळ) यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी व मनसैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.