For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करा

12:16 PM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करा
Advertisement

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन 

Advertisement

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वेंगुर्ला रोडसह सर्वच महत्त्वाचे रस्ते खराब झाले आहेत.या खराब रस्त्यांबाबत नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला जाब विचारण्यात आला. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंतरराज्य महामार्ग पूर्णपणे खराब झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याचे प्रश्न लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव तालुक्यातील विविध गावातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेतली. तालुक्यातील बेळगाव-बाची, बडस-बाकनूर, उचगाव-बेकिनकेरे, मच्छे-वाघवडे, कर्ले-बेळवट्टी, सांबरा-मुतगा या रस्त्यांची दुरवस्था झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. नागरिकांकडून निवेदने दिली जात असली तरी कोणतीही कार्यवाही होत नसल्याची तक्रार व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सोबरद म्हणाले, वेंगुर्ला महामार्गासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  हा निधी कोणत्या टप्प्यात खर्च होईल, याची चाचपणी केली जाणार असून त्यानंतर निविदा काढल्या जाणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. तसेच सध्या तात्पुरत्या स्वरुपात खडी टाकून रोलर फिरविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बडस-बाकनूर हा रस्ता मंजूर झाला असून त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उचगाव-बेकिनकेरे या रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मच्छे-वाघवडे रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. तसेच कंग्राळी के.एच. येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीनजीकच्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी अधिकारी कोळेकर, मार्कंडेय कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, लक्ष्मण लाळगे, किसन सुंठकर यांसह नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.