For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरमल पार्सेकरवाडा जीर्ण पुलाची त्वरित दुरूस्ती करा

12:35 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरमल पार्सेकरवाडा जीर्ण पुलाची त्वरित दुरूस्ती करा
Advertisement

माजी सरपंच रामचंद्र केरकर यांची मागणी, सुमारे 30 वर्षापूर्वीचा पूल, लोखंडी सळ्या उघड्या पडल्या, दुर्घटना घडण्याची शक्यता

Advertisement

वार्ताहर /हरमल

हरमल पंचायतक्षेत्रातील पार्सेकरवाडा येथील जीर्ण, कमकुवत झालेल्या पुलावर अनर्थ घडण्यापूर्वी त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली. हरमल पार्सेकरवाडा येथील सुमारे 30 वर्षापूर्वी बांधलेला हा पूल जीर्ण झाला आहे. पुलाखालील भागाचे सिमेंट काँक्रिट पडले असून लोखंडी सळ्या उघड्या दिसत आहेत. या पुलावरून शालेय बालरथ व अन्य वाहने मोठ्या संख्येने जातात.पूल जीर्ण झाला असून कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता केरकर यांनी व्यक्त केली. या पुलानजिक चतुर्थीकाळात पाणी साठून त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्याशिवाय बंधारा असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही शेती उत्पादन घेण्यास संधी मिळते. त्यासाठी जलस्रोत खात्याने ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी रामचंद केरकर यांनी केली. गेल्या महिन्यात मान्सूनपूर्व बैठकीत जलस्रोत खात्याचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे अधिकारी यांच्यात तू तू-मैं मैं झाल्याने सरपंच रजनी इब्रामपूरकर संतप्त झाल्या होत्या. या पुलाबाबत अनर्थ घडल्यास दोन्ही खात्याचे अधिकारी जबाबदार असतील, असे सरपंच इब्रामपूरकर यांनी सांगितले. त्यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी मध्यस्थी करून अधिकाऱ्यांना समज दिली. आमदार जीत आरोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पुलाचे काम मार्गी लावावे व शेतकऱ्यांना बंधारा पूर्ववत करून देण्याची मागणी होत आहे.

Advertisement

लोखंडी सळ्या तुटण्याची शक्यता

पावसाळ्यात सदर ओहोळ दुथडी भरून वाहत असल्याने लोखंडी सळ्या तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ता विभाग  व जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकामी जातीने लक्ष घालून सदर पुलाची तातडीने दुऊस्ती करावी, अशी मागणी रामचंद्र केरकर यांनी केली.

Advertisement
Tags :

.