‘बर्च’ची सर्व बांधकामे तातडीने पाडा
पंचायत खात्याचे अतिरिक्त संचालक ज्यो फर्नांडिस यांचा आदेश
पणजी : हडफडे येथील 25 जणांचे बळी घेणाऱ्या ‘बर्च रोमिओ लेन’ या नाईट क्लबच्या बांधकामास देण्यात आलेली स्थगिती पंचायत खात्याने उठविली असून ते पाडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सदर बांधकाम पाडण्याचा आदेश खात्याने बजावला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सदर क्लबचे बांधकाम पाडण्याचा आदेश हडफडे-नागवे पंचायतीने दिला होता. त्या आदेशाला क्लबतर्फे पंचायत खात्याकडे आव्हान याचिका सादर करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन पंचायतीच्या आदेशाला स्थिगिती देण्याचे आणि ‘जैसे थे’ बांधकाम ठेवण्याचे निर्देश पंचायत खात्याने दिले होते. वर्ष 2024 मध्ये या सर्व घडामोडी झाल्या होत्या.
त्यानंतर मागील वर्षीच्या म्हणजे 2025 डिसेंबर महिन्यात त्याच क्लबला काही कारणामुळे आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण देश- विदेशात गाजले होते. हे प्रकरण आता थंड झाल्यानंतर या नाईट क्लबचे बांधकाम कायदेशीर व्हावे म्हणून ‘बर्च’ चे व्यवस्थापक सुरिंदर खोसला यांनी पंचायत खात्याकडे नव्याने अर्ज केला होता. शिवाय 6 वेगवेगळी बांधकामे नियमित करण्यासाठी 6 वेगळे अर्ज सादर केले होते. त्यावर निवाडा देताना पंचायत खात्याचे अतिरिक्त संचालक ज्यो फर्नांडिस यांनी सर्व अर्ज फेटाळून फेटाळून निकालात काढले आणि यापूर्वी देण्यात आलेली स्थगिती उठविली. हे करताना ‘बर्च’ क्लबमधील दुकान, रेस्टॉरन्ट, इतर 6 बांधकामे व दोन प्लॅटफॉर्म अशी सर्व बांधकामे पंचायतीने तातडीने तोडावीत, असा आदेश त्यांनी बजावला आहे.
कायदेशरिता सिद्ध करणारी कागदपत्रे नाहीत!
पंचायत खाते आणि बर्च क्लबतर्फे दोन्ही बाजूच्या वकिलांनी तेथे युक्तिवाद केला. फर्नांडिस यांच्यासमोर क्लबच्या कायदेशीरतेबाबत सुनावणी झाली. पंचायत खात्यातर्फे अॅड. सिद्धेश प्रभुदेसाई यांनी ‘बर्च’ क्लबची कायदेशीरता सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत, प्लॅन नाही त्यामुळे क्लबचे बांधकाम कायदेशीर होत नाही व करताही येत नाही, असे निदर्शनास आणले. क्लबच्यावतीने काम पाहणारे अॅड. सेबेस्तियांव वालेस यांनी या निकलास जिल्हा न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.