सावंतवाडीतील बंद सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करा
नगरसेवक देव्या सूर्याजींची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
सावंतवाडी -
सावंतवाडी शहरातील बाजारपेठ परिसरात बंद असणारे सीसीटीव्ही सुरु करून मच्छी मार्केट येथे रहदारीच्या ठिकाणी होमगार्डची नेमणूक करावी. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय भवानी चौक, सालईवाडा,जय प्रकाश चौक, गांधी चौक येथील बरीच वर्षे बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत अशी मागणी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भर बाजारपेठेत होणाऱ्या चोरीचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे.मच्छी मार्केट परिसरात दर रविवार व बुधवारी वाहनांची कोंडी होते व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहाणा-या रहिवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या वाहतूककोंडीत गंभीर रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकार घडत असून काही विपरित घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे यावेळी ॲड.प्रथमेश प्रभू, ॲड. प्रसाद नाटेकर, प्रफुल गोंदावळे,निलांग सावंत आदी उपस्थित होते.