गाझामधील हिंसा तत्काळ रोखा
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडली भूमिका
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
गाझामधील तणाव तत्काळ कमी करण्याचे आणि हिंसा रोखण्याचे आवाहन भारताने इस्रायलला केले आहे. सर्व ओलिसांची मुक्तता करण्यात यावी आणि तणाव वाढविणाऱ्या कारवायांना टाळण्यात यावे. तसेच शांतता चर्चा लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत केले आहे.
भारत दहशतवादाच्या सर्व स्वरुपांना नेहमीच विरोध करत आला आहे. हिंसेला आणखी वाढण्यापासून आणि तेथे होणारे मृत्यू रोखणे आवश्यक आहे. कुठल्याही स्थितीत आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हावे असे कंबोज यांनी म्हटले आहे. गाझा आरोग्य मंत्रालयानुसार संघर्षात आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
मानवीय संकट चिघळले असून क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ लागली आहे. भारताने पॅलेस्टाइनच्या लोकांना मानवीय सहाय्य प्रदान केले असून यापुढेही करत राहणार आहे. स्थिती आणखी बिघडण्यापासून रोखण्यासाठी गाझाच्या लोकांकरता मानवीय सहाय्याचे प्रमाण त्वरित वाढविले जावे अशी भूमिका कंबोज यांनी मांडली आहे.
अमेरिकेचा नकाराधिकार, ब्रिटन अनुपस्थित
सुरक्षा परिषदेत अल्जीरियाकडून गाझामधील संघर्षासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर अमेरिकेने नकाराधिकार वापरत तो निकालात काढला आहे. हा प्रस्ताव शस्त्रसंधीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांकरता अडथळे निर्माण करू शकतो. याचमुळे आम्ही नकाराधिकार वापरला असल्याचा दावा अमेरिकेचे उपस्थायी प्रतिनिधी रॉबर्ट वुड यांनी केला आहे. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत 13 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. तर अमेरिकेने नकाराधिकार वापरला आणि ब्रिटन अनुपस्थित राहिला आहे.