महिलेच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी युवकाचे तात्काळ रक्तदान
ओटवणे प्रतिनिधी
अचानक उद्भवलेल्या महिलेच्या तातडीच्या अवघड शस्त्रक्रियेसाठी कुडाळ येथे तात्काळ दुर्मिळ अशा बी निगेटीव्ह रक्ताची गरज होती. यावेळी या महिलेचे पती संतोष चांदेकर यांनी या दुर्मिळ रक्तगटाचा उभादांडा येथील रक्तदाता जय मांजरेकर याच्याशी संपर्क साधला. यावेळी जय मांजरेकर या युवकाने वेळेची तमा न बाळगता तात्काळ मध्यरात्री ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत जात रक्तदान केले. त्यानंतर या महिलेची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली. मोचेमाड येथील सौ समिक्षा संतोष चांदेकर ही महिला कुडाळ येथील डाॅ. विशाखा पाटील हाॅस्पिटलमध्ये दाखल होती. त्यांच्यावर शनिवारी सकाळीच तातडीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग आला. मात्र तातडीच्या या शस्त्रक्रियेसाठी बि निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. दुर्मिळ रक्तगट असल्याने रात्रीच्यावेळी तात्काळ रक्तदाता मिळणे सहजशक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे पती संतोष चांदेकर यांनी शुक्रवारी रात्री या दुर्मिळ रक्तगटाचे उभादांडा येथील रक्तदाता जय मांजरेकर याच्याशी संपर्क साधला.यावेळी जय मांजरेकर याने रात्री पावणे अकरा वाजले असताना क्षणाचाही विचार न करता तात्काळ उभादांडा येथील आपला मित्र साईराज गिरप या मित्रासह रात्री पावणेबारा वाजता जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. रक्तदान करुन मध्यरात्रीनंतर पावणेतीन वाजता ते दोघेजण उभादांडा येथे पोहोचले. त्यामुळे जय मांजरेकर याच्या दुर्मिळ रक्तगटाच्या या तत्पर रक्तदानातून या महिलेवर गुंतागुंतीचे यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी जय मांजरेकर यांचे तसेच ऑन काॅल रक्तदाते संस्थेचे आभार मानले. बावीस वर्षीय जय मांजरेकर याचे हे अवघ्या पाच वर्षातील तब्बल सोळावे रक्तदान आहे. तसेच त्याने अत्यंत कठीण असे एसडीपी डोनेशन सुद्धा केलेले आहे. अशा अनेक गुंतागुंतीसह बायपास शस्त्रक्रियेच्या रुग्णांसाठी ऑन काॅल रक्तदाते संस्थेचे नेहमीच तत्पर असून जय मांजरेकर याच्यासारख्या तत्पर रक्तदात्यांचा ऑन कॉल रक्तदाते संस्थेला अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.