जीआयटी संघाकडे आयएमईआर चषक
सुदर्शन चौगुले उत्कृष्ट खेळाडू : अजिज राऊत उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : केएलएस, आयएमईआर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयोजित तिसऱ्या आयएमईआर चषक आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत जीआयटी संघाने एसजीबीआयटी संघाचा 1-0 असा पराभव करून तिसरा आयएमईआर चषक फटकावला. सुदर्शन चौगुले उत्कृष्ट खेळाडू : अजिज राऊत उत्कृष्ट गोलरक्षक यांना चषक देऊन गौरविण्यात आले. जीआयटी मैदानावर स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसजीबीआयटी संघाने गोगटे अ संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला गोगटेच्या स्वयंमने गोल करण्याची नामीसंधी दवडली. 18 व्या मिनिटाला एसजीबीआयटीच्या उजेरने मारलेला फटका गोगटेच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला गोगटेच्या प्रज्वलने वेगवान फटका गोलमुखात मारला होता. पण चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर करून त्यामध्ये एसजीबीआयटीने 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. एसजीबीआयटीतर्फे ओजस, उजेर, सादिक, फैजल यांनी गोल केले. तर गोगटेतर्फे ओमकार, श्रेयर व प्रज्वल यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जीआयटीने जीएसएसचा 3-0 असा पराभव केला. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला जीआयटीच्या सुदर्शन चौगुलेच्या पासवर बसूने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 18 व्या मिनिटाला जीएसएसच्या अॅस्टीनने गोल करण्याची संधी दवडली.
दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनिटाला जीआयटीच्या सुदर्शन चौगुलेच्या पासवर निखील नेसरीकरने सुरेख गोल करून 1-0 ची महत्त्वाची आघाडी जीआयटीला मिळवून दिली. 45 व्या मिनिटाला एसजीबीआयटीच्या कैफने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने गोल करण्याची संधी वाया गेली. शेवटी हा सामना जीआयटीने 1-0 असा जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. आरिफ शेख, जॉर्ज राँड्रिग्ज, साहिलकुमार, सुमंत देसाई यांच्या हस्ते विजेत्या जाआयटी संघाला 15 हजार रुपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या एसजीबीआयटी संघाला 10 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुदर्शन चौगुले जीआयटी, उत्कृष्ट गोलरक्षक अजिज राऊत एसजीबीआयटी तर शिस्तबद्ध संघ म्हणून भरतेश होमिओपॅथिक यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, सुदर्शन चौगुले, यश सुतार व ओमकार मुचंडी यांनी काम पाहिले.