Monsoon Update पुढील दोन आठवडे पाऊस कमीच किनारपट्टीवर पाऊस, इतरत्र पावसाची तूट
त.भा.प्रतिनिधी पुणे
देशात तसेच राज्यात पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही कोकण, गोवा किनारपट्टीवर पावसाची स्थिती बरी असेल, मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाच्या भागात पावसाची तूट राहणार असल्याचे चित्र आहे.
मोसमी वाऱ्यांनी 9 जुलै रोजी देश व्यापला असून, सर्वदूर आता दमदार पाऊस होत आहे. राज्याला पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने 23 जुलैपर्यंतचा राज्याचा, देशाचा हवामान अंदाज दिला आहे.
यानुसार, उत्तरपश्चिम बंगालच्या उपसागरात 15 जुलैपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. गुजरात ते कर्नाटक दरम्यानचा हवेचा दबाव या आठवड्यात देखील कायम राहणार आहे. तसेच अरबी समुद्रावरुन येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांत वाढ होणार असल्याने 15 जुलैपर्यंतच्या आठवड्यात पूर्ण पश्चिम किनारपट्टी यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक केरळ, तसेच मध्य भारतात पावसाची तीव्रता राहणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
दुसऱ्या आठवड्यात 16 ते 23 जुलैदरम्यान देखील कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर राहील, मात्र राज्याच्या इतर भागात पावसाची तूट राहणार आहे. राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकच्या भागात पावसाची ओढ राहील, या कालावधीत उत्तर, पूर्व भारतासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण अधिक असेल.
केवळ विदर्भात पाऊस
दरम्यान, राज्यातील पाऊस पूर्णपणे ओसरला आहे. रविवारपासून केवळ विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे. धरणांतून होणार विसर्गही बंद करण्यात आला असून, नदीपात्रातील पाणी देखील कमी झाले आहे. आठवडाभराच्या पावसामुळे राज्याच्या धरणसाठ्यात मात्र मोठी वाढ झाली असून, तो 42.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.