कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इमेजिन’ सिटीचा कारभार ‘अन इमेजिनेबल’!

12:26 PM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नियोजनशून्यतेमुळे जनतेच्या पैशांची धुळवड : वारंवारच्या डेडलाईन ठरतायत फुसके बार

Advertisement

पणजी : स्मार्ट सिटी बनविण्याच्या प्रयत्नांतून राजधानी पणजी शहरात चाललेली विकासकामे संपण्याचे नावच घेत नसल्याने नागरिक पूर्णत: वैतागले असून सरकारच्या विविध यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या डेडलाईनवरही आता कुणाचा विश्वास राहिला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेली खोदकामे आणि उत्खननांमुळे राजधानीला एखाद्या खाण परिसरापेक्षाही भोंगळ रूप प्राप्त झाले आहे. खाणींवर वावरणाऱ्या यंत्रांसारखीच मोठमोठी अवजड यंत्रे येथेही वावरत असल्याने संपूर्ण शहर धूळ प्रदूषणाने भरून गेले आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.

Advertisement

लोकांच्या खाणाजेवणात धूळ

लोकांच्या घरादारात आणि खाणाजेवणात धूळ भरून राहत असल्याने अनेकांना दम्यासारखे श्वसनरोग आणि अन्य आजारांनी ग्रासले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तर हालांना पारावारच राहिलेला नाही. त्यातून उच्च न्यायालयापर्यंत अनेक तक्रारी करण्यात आल्या. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून फोटो, बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु कोणत्याही यंत्रणेवर कोणतेही परिणाम होत नाहीत, असेच चित्र आहे.

नावापुरत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

यावर मलमपट्टी किंवा नागरिकांच्या रोषापासून बचावासाठी म्हणून इमेजिन पणजी स्मार्ट सिटी कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या बाजूने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही स्वत: रस्त्यावर उतरताना राजधानीतील सावळ्या गोंधळाची पाहणी केली. त्यानंतर लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. निदान आता तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून होते.

आश्वासने म्हणजे दिवास्वप्ने

भरीस येत्या दि. 31 मे पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असे ठाम आश्वासनही स्मार्ट सिटी कंपनीकडून देण्यात आले होते. हे सर्व प्रकार म्हणजे नागरिकांसाठी दिवास्वप्नच ठरले असून 31 मे ‘हाकेच्या अंतरावर’ पोहोचलेला असताना आजसुद्धा राजधानीत चाललेली खोदकामे पाहता वर्ष 2025 च्या मे पर्यंतसुद्धा ही कामे पूर्ण होणार नाहीत, असेच चित्र आहे.

‘डेडलाईन’ देणारेच बदलतात डेडलाईन

लोकांचा असा समज होण्यास स्वत: ‘डेडलाईन’ देणारेच कारणीभूत आहेत. त्याचा पुरावा म्हणजे दि. 31 मे ची डेडलाईन देणाऱ्यांनीच सध्या सांतीनेज भागात चालणारे स्मार्ट काम पूर्ण होण्यासाठी 10 जून पर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यासाठी तेथील मॉल पासून टोक येथील मलनिस्सारण प्रकल्पापर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. यावरून हे सिद्ध झाले आहे. अशावेळी डेडलाईनवर लोक विश्वास ठेवतील तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाईल तिथे खोदकामे

गेल्या काही वर्षांपासून चाललेली विकासकामे सध्या जवळजवळ पूर्णत्वाकडे पोहोचली होती. अनेक ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरणही पूर्ण करण्यात आले होते. अशावेळी आता अचानकपणे काही भागात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा एकदा खोदकामे हाती घेण्यात आली आहेत. काही भागात तर एकाच ठिकाणी तब्बल पाच ते सहा वेळा विविध प्रकारच्या कामांसाठी खोदकामे करण्यात आली आहेत. आझाद मैदान परिसरात झालेली खोदकामे हे याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.

संपता संपत नाही खोदकामे

गत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या कालावधित गोव्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आझाद मैदानावर भेट देण्याची शक्यता असल्याने त्या भागात सुरू असलेले विकासकाम घाईगडबडीत पूर्ण करून एका रात्रीत हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत किमान सहा वेळा तेथे विविध कारणांसाठी खोदकामे करण्यात आली आहेत. ती अद्याप संपलेली नाहीत. हे सर्व प्रकार पाहता इमेजिन सिटी कंपनीत अभियंतेच भरलेले आहेत की, अन्य ... असा सवाल सर्वसामान्य लोक उपस्थित करू लागले आहेत. एखाद्या भागात किती प्रकारची कामे करायची आहेत, याचे आधीच आराखडे, नियोजन करून खोदकामे केली असती तर ती एकहाती पूर्ण झाली असती. परंतु तसे न करता ‘प्रत्येक कामासाठी नव्याने खोदकाम’, अशी मालिकाच सुरू ठेवण्यात येत असल्याने माऊतीच्या शेपटीप्रमाणे कामे लांबत चालली आहेत. आता तर हे प्रकार एवढ्या विकोपाला पोहोचले आहेत आणि त्याविरोधात लोकांची ओरड होत असतानाही सरकारी यंत्रणा ढिम्म आहे. त्यामुळे दिलेल्या डेडलाईन्स खरोखरच वचनाला जागतील की ’इमेजिन सिटीचा कारभार अनइमेजिनेबल’! असेच लोकांना म्हणावे लागेल, असाही सवाल उपस्थित झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article