Konkan News: गुरांची बेकायदा वाहतूक करणारी चारचाकी पकडली, पोलिसांची धडक कारवाई
एका तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
देवरुख : गुरांची बेकायदा वाहतूक करताना मुर्शी चेकपोस्ट येथे एक बोलेरो पिकअप गाडी देवरुख पोलिसांनी पकडली. गुरे आणि बोलेरोसह एकूण 3 लाख 73 हजाराचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी शाहूवाडी येथील दोन तर देवरुखातील एका तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबत पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाड यांनी खबर दिली. सागर नामदेव पाटील (31), प्रदीप अरुण लाटवडेकर (दोघेही रा. पिशवी ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), नागेश कदम (देवरुख-बौद्धवाडी) यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री 8.30च्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकपोस्ट येथे देवरुख पोलीस वाहनांची तपासणी करत होते. सागर पाटील हा बोलेरो पिकअप (क्र. एमएच-09, ईएम-4929) घेवून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. मुर्शी चेकपोस्ट नाक्यावर पोलिसांना तपासणीदरम्यान गुरांना गाडीत हालचाल करता येणार नाही, त्यांना वेदना होतील अशाप्रकारे बांधल्याचे दिसून आले.
गुरांना दुखापत होवू नये म्हणून कोणतीही काळजी घेतलेली नाही. गुरांची वैद्यकीय तपासणी केलेली नाही. चारा-पाण्याची सोय केलेली नाही, तसेच गुरे खरेदी-विक्रीची पावती सागर याच्याकडे नव्हती. गुरे वाहतुकीचा व वाहन चालवण्याचा परवानाही सागरकडे सापडला नसल्याचे देवरुख पोलिसांनी सांगितले.
देवरुख पोलिसांनी गुरे आणि 3 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या बोलेरोसह एकूण 3 लाख 73 हजारांचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव, संजय कारंडे, सुहास लाड यांनी केली. या प्रकरणी सागर पाटील, प्रदीप लाटवडेकर, नागेश कदम यांच्याविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.