बेकायदा वाळू: अधिकाऱ्यांचा पदार्फाश
तलाठी, निरीक्षक, मामलेदार, पोलिसांत नाही सुसंवाद : जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायालयात सखोल अहवाल सादर
पणजी : न्यायालयाने बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्याचा आदेश देऊनही डिचोली तालुक्यातील विर्डी-साखळी या ठिकाणावरील वाळू उपशाबाबत कारवाई करण्यास तलाठी, सर्कल निरीक्षक, मामलेदार आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद आणि एकवाक्यता नसल्याची माहिती तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात उघड झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याने ‘गोवा नदीचे वाळू संरक्षक नेटवर्क’ संघटनेने दुसऱ्यांदा अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
डिचोली मामलेदाराला नोटीस
या याचिकेवरील मागील सुनावणीवेळी साखळीच्या तलाठ्याने विर्डी-साखळी येथे बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे कळवूनही त्यावर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या डिचोली मामलेदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्या. भारती डांगरे आणि न्या. निवेदिता मेहता यांनी 3 एप्रिल 2025 रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या आदेशानुसार डिचोलीचे विद्यमान मामलेदार प्रवीण गावस तसेच तत्कालीन मामलेदार विनोद दलाल आणि सिद्धार्थ प्रभू यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते.
अहवाल मामलेदारापर्यंत आलाच नाही
विनोद दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तलाठ्याने डिचोली मामलेदाराच्या कार्यालयात सदर अहवाल इनवर्ड केलाच नसल्याने त्याच्यापर्यंत तो अहवाल आलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर दलाल हे रजेवर गेले. त्यानंतर त्यांची बदली झाली असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
प्रभूंकडेही पोहोचलाच नाही अहवाल
दलाल यांच्या रजेच्या काळात सिद्धार्थ प्रभू यांना अतिरिक्त ताबा देण्यात आला होता, आणि त्यांनीही आपल्यापर्यंत सदर अहवाल पोचलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर 1 जुलैपासून सिद्धार्थ प्रभू यांच्याकडे सदर जागेचा ताबा असला तरी तलाठ्याने विर्डीबाबतचा अहवाल 25 जुलैला दिला होता.
मध्येच आला मुसळधार पाऊस
मात्र त्या दरम्यान डिचोली तालुक्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्य, झाडे आणि घरे कोसळणे आदी संकटांना अधिक प्राधान्य द्यावे लागले होते. तरीही प्रभू यांनी सर्कल निरीक्षकाला नोट पाठवून खाण खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पाहणीसाठी तारीख निश्चित करण्यास सांगितले. मात्र सर्कल निरीक्षकाने सदर आदेशाकडे दुर्लक्ष केले असल्याचे उघड झाले आहे.
अधिकाऱ्यांमधील सुसंवादासाठी ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’
उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी दिलेल्या अहवालात तलाठी नेहमी त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या सर्कल निरीक्षकाकडे आपला अहवाल सुपूर्द करतो. मात्र या अहवालाकडे आणि त्यावरील कार्यवाहीकडे सर्कल निरीक्षकाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यापुढे बेकायदेशीर वाळू उपसाप्रकरणी कारवाई करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’द्वारे एकमेकांना माहिती देण्याची सूचना केली आहे. या गटात तलाठी, सर्कल निरीक्षक, मामलेदार आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची सूचना दिली असल्याचे गीते यांनी न्यायालयाला सांगितले.