अवैध वाळू उपशामुळे नदी-नाल्यांचे पाणी गढूळ
खानापूर तालुक्यात वाळू उपसा करताना खबरदारी घेणे गरजेचे : संबंधित खात्यांचा वरदहस्त असल्याने सोयीस्कर दुर्लक्ष
खानापूर : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीसह इतर नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. वाळू उपशाचे पाणी नदी- नाल्यात सोडल्याने मलप्रभा नदीचे पाणी गढूळ होऊन दूषित झाले आहे. तसेच नदी नाल्याचे पात्रही बदलले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणासह मानव व जनावरांवरही होत आहे. या अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यावर संबंधित खात्यांचा वरदहस्त असल्याने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. मलप्रभेचे दूषित पाणी शहराला पाणीपुरवठाद्वारे पुरविण्यात येते. या पाण्यामुळ रोगराई पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी व काही समाज सेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मलप्रभेसह हलात्री व इतर नदी-नाल्यांच्या पात्राशेजारी, पात्रात आणि मालकी जमिनीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. या वाळू उपशाचे पाणी मलप्रभा नदीत सोडण्यात येत असल्याने संपूर्ण पाणी दूषित झाले असून, पूर्णपणे गढूळ झाले आहे. हेच पाणी खानापूर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे उपसा करून शहरासह उपनगराला पुरविण्यात येते. या दूषित पाण्यामुळे शहरात रोगराई पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे. याकडे नगरपंचायतीने देखील साफ दुर्लक्ष केले आहे. तसेच पोलीस, वनखाते व भू-गर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या वाळू उपशावर शासनाचा तसेच अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्मयाच्या काही ग्रामीण भागातून वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने मलप्रभा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुन्या पुलाच्या जागी नव्याने बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येणार आहे. त्यामुळे हे पाणी जास्तच गढूळ होण्याचा धोका आहे. हे पाणी खानापूर शहरवासीयांना शुद्ध, स्वच्छ करून सोडले जात असले तरी, पाण्यात मिसळणारी मळही आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महसूल विभागाकडून तसेच नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सोईस्कररित्या दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी संबंधित खात्याने गांभीर्याने लक्ष घालून अवैद्य वाळू उपसाद्वारे मलप्रभेचे पाणी दूषित होणार नाही, यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नदी-नाल्यांचे प्रवाह बदललेले तरीही कानाडोळा
नदी-नालाच्या पात्रातून इंजिन तसेच यंत्राच्या साहाय्याने अनैसर्गिकरित्या वाळू उपसा करण्यात येत असल्याने नाल्यांच्या तसेच शेतीच्या ठिकाणी मोठे खण सदृश खड्डे निर्माण झाल्याने नदी-नाल्यांचे प्रवाह बदललेले आहेत. वनखाते, पोलीस खाते या गोष्टीकडे अनेकवेळा कानाडोळा करत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे.