बंद ढाब्यामध्ये बेकायदा दारूविक्री
हिरेबागेवाडीजवळ अबकारी खात्याचा छापा
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या एका बंद ढाब्यावर छापा टाकून अबकारी अधिकाऱ्यांनी बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचाही समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव शहर व तालुक्यात दारूविक्री बंदीचा आदेश जारी केला होता. या आदेशाचे उल्लंघन करून दारूविक्री केली जात होती. मुत्नाळ येथील राजू कोंडीबा वाघमोरे (वय 45) याने आपल्या घरी व बंद पडलेल्या ढाब्यावर 27 लिटर 930 मिली गोवा बनावटीची दारू, 63 लिटर बेकायदा दारूसाठा व 40 लिटर 600 मिली बियर साठवली होती. हा साठा अबकारी विभागाने जप्त केला आहे.