हुलबत्ते कॉलनीमध्ये बेकायदा दारूसाठा जप्त
महाद्वार रोडच्या युवकावर एफआयआर : 313.3 लिटर बेकायदा दारूसाठा हस्तगत
बेळगाव : हुलबत्ते कॉलनी, शहापूर येथील एका घरावर छापा टाकून 313.3 लिटर बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शहापूर पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली असून यासंबंधी महाद्वार रोड येथील एका युवकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुभाष सुधीर डे (वय 46) रा. महाद्वार रोड याने साठवून ठेवलेली गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी, हवालदार नागराज ओसप्पगोळ, संदीप बागडी, जगदीश हादिमनी, श्रीधर तळवार, श्रीशैल गोखावी, सुरेश लोकुरे, अजित शिप्पुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड, विजय कमते आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. सुभाष डे वर यापूर्वीही पोलीस व अबकारी विभागाने कारवाई केली आहे. जास्त किमतीला विक्री करण्यासाठी त्याने गोवा बनावटीची 313.3 लिटर दारू पहिला क्रॉस, हुलबत्ते कॉलनी, शहापूर येथील एका नातेवाईकांच्या घरी साठवून ठेवली होती. त्याची किंमत 1 लाख 37 हजार 681 रुपये इतकी होते. यासंबंधीची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी त्या घरावर छापा टाकून दारूसाठा जप्त केला आहे.