Sangli Crime | पुण्यातील दारूकांडाची धग सांगलीत! लकडेवाडी आणि भिवर्गी गावातील 'त्या' खुनांचे धक्कादायक कनेक्शन समोर
माडग्याळ ( संभाजी सावंत ) -पुणे जिल्ह्यातील दारुकांडात विषारी मद्य सेवनामुळे १९ हुन अधिक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात विशेष मोहिमा हाती घेत कारवाईचा सपाटा लावला. मात्र, प्रत्येक वेळी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुण्यातील दुर्घटनेची धग अद्याप कायम असतानाच जत तालुक्यातील लकडेवाडीआणि भिवर्गी येथे घडलेल्या दोन खुनांच्या घटनांनी ग्रामीण भागातील दारूच्या वाढत्या विळख्याचे भयावह वास्तव समोर आणले आहे. लकडेवाडी येथे दारूच्या नशेत पत्नीला बारंबार मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा वादातून स्वतःच्या मुलाकडून खून झाला. तर भिवर्गी येथे दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून एका २५ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. दोन्ही घटनांमागे दारूचे व्यसन आणि त्यातून निर्माण झालेला हिंसाचार हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.
या घटनांनंतर राज्य उत्पादनशुल्क विभागाने सांगली जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ४१ गुन्हे दाखल केले, २९ आरोपींना अटक केली आणि मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य जप्त केल्याची माहिती दिली. मात्र, या कारवाईमुळेनागरिकांच्या मनातील प्रश्न संपलेले नाहीत.ग्रामीण भागातील बास्तब असे आहे की, अनेक गावांमध्ये अवैध दारूचे अड्डे खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. गावोगावी, बाड्या-वस्त्यांवर, धाब्यावर आणि गल्लीबोळात अवैध दारू बिक्री सुरू असताना संबंधित यंत्रणांना त्याची माहिती नसणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तरीही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई क्वचितच दिसून येते. माडग्याळ सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावात भर बस स्थानक चैकात अवैधरित्या देशी दारू खुलेआम बिकली जाते याची माहिती पोलिसांना नसेल काय, असा प्रश्न नागरिकातूनविचारला जाऊ लागला आहे. लकडेवाडी येथील खुनाच्या घटनेतील आरोपी दिवसभर माडग्याळ येथेच दारू पित होता, अशी चर्चा नागरिकातून आहे.
अवैध दारू हा केवळ कायद्याचा विषय राहिलेला नाही, तर तो कौटुंबिक विघटनाचा गंभीर प्रश्र बनला आहे. त्यामुळे केवळ अधूनमधून छापे टाकून नव्हे, तर अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालणारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुर्घटना झाल्यानंतर कारवाई ही पद्धत बदलून 'दुर्घटना होण्यापूर्वी प्रतिबंध'ही भूमिका प्रशासनाने स्वीकारली तरच पुणे व जतसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.