कुडाळला सुमारे पावणे तीन लाखाचा अवैध गुटखा जप्त
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
कुडाळ -
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ - बाजारपेठ येथील एका पान टपरीवर छापा टाकून २ लाख ८८ हजार ६६० रू .किमतीचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.याप्रकरणी चार जणांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन संशयीताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली. कुडाळ शहरातील बाजारपेठेत एका पान टपरीवर अवैध गुटखा व तंबाखूजन्य अन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली.त्यामुळे या शाखेच्या पथकाने काल सायंकाळी येथील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या बाजूला असलेल्या पान टपरीवर छापा टाकला. यात अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला. या प्रकरणी इमरान शमसुद्दीन करोल, (रा. कुडाळ - करोलवाडी ) , इम्तियाज शमसुद्दीन करोल (रा. कुडाळ - करोलवाडी ) ,आरिफ करोल (रा. कुडाळ - शिवाजीनगर ) व समीर पठाण ( रा. हुबळी - कर्नाटक ) या चार जणांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. २ लाख ८८ हजार ६६० रू.चा मुद्देमाल व संशयित इमरान करोल, व इम्तियाज करोल या दोघांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड हवालदार विल्सन डिसोजा व आशिष जामदार या पथकाने कारवाई केली.