बडाल अंकलगीजवळील हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल?
वन अधिकाऱ्यांकडे तक्रार : दोषींवर कारवाईची मागणी
बेळगाव : बडाल अंकलगीजवळील (ता. बेळगाव) कौरीगुडा रेणुकादेवी देवस्थान परिसरातील झाडांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थानी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. सोलार प्रकल्पाच्या नाव़ाखाली बडाल अंकलगी नजिकच्या कौरीगुडा रेणुका देवस्थान परिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याची माहिती भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांना व ग्रामस्थाना मिळताच त्यांनी वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार मांडली.
कोणत्याही प्रकल्पाला जमीन देत असताना ती कोणाच्या मालकीची किंवा कोणाच्या कार्यक्षेत्रातील याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. जवळच सुमारे 55 एकर सरकारी मालकीची खुली जागा आहे. त्याचा उपयोग सोलार प्रकल्पासाठी करता आला असता. पण, अधिकाऱ्यांनी दाट जंगल असलेली जमीन प्रकल्पाला दिली आहे. तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी या जमिनीबाबत निरीक्षण न करता प्रकल्पासाठी जमीन कशी मंजूर केली असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला आहे.
संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार व कंपनीने वन विभागाची परवानगी न घेता मोठे मशिन आणून हजारो झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये चंदनासारखी किमती झाडे होती. ही झाडे मूळासकट उचकटून नेण्यात आली आहेत. दोषींवर बुधवारपर्यंत कारवाई न झाल्यास गुऊवारी वन खात्याच्या कार्यालयाला घेराव घालू, असा इशाराही धनंजय जाधव व ग्रामस्थांनी दिला आहे.