For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकायदा कत्तलखान्याचा पदार्फाश

12:24 PM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकायदा कत्तलखान्याचा पदार्फाश
Advertisement

खारेबांद येथे गुरांच्या चरबीचे 41 डबे सापडले : तब्बल 82 गुरांच्या कत्तलीची शक्यता

Advertisement

मडगाव : खारेबांद-मडगाव येथील एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर गुरांचा बेकायदेशीर कत्तलखाना चालविला जात होता. या कत्तलखान्याचा बजरंग दलाने रविवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. या कत्तलखान्यातून दोन बैलांची सुटका करण्यात बजरंग दलाने यश मिळविले. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी गुरांची चरबी भरून ठेवलेले तब्बल 41 डबे आढळून आल्याने तिरुपती येथे उघडकीस आलेल्यासारखेच कारस्थान येथेही उघड झाले आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी कत्तलखाना चालविणाऱ्या अस्लम बेपारी याच्यावर गुन्हा नोंद केला असला तरी तो बेपत्ता आहे.

रविवारी 22 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या दरम्यान बजरंग दलाला खारेबांद-मडगाव येथे गुरांची बेकायदा कत्तल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्याप्रमाणे, बजरंग दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोचले व त्यांनी हा चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर सुरू असलेला कत्तलखाना पोलिसांच्या मदतीने शोधून काढला. या ठिकाणी दोन रेडे व दोन बैल कत्तल करण्यासाठी आणून ठेवले होते. त्यातील दोन रेडे गायब करण्यात आले तर दोन बैल या ठिकाणी बांधून ठेवलेले आढळून आले. या बैलांची सुटका ध्यान फाऊंडेशनच्या मदतीने करण्यात आली.

Advertisement

चरबी, दुर्गंधीयुक्त मांस सापडले

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलखान्याच्या आतमध्ये प्रवेश केला असता, त्यांना गुरांची चरबी भरून ठेवलेले तब्बल 41 डबे आढळून आले. तसेच गुरांची चरबी काढून झाल्यानंतर जे मांस शिल्लक राहिले होते, ते एका मोठ्या बादलीत भरून ठेवले होते. संतापजनक बाब म्हणजे त्या मांसाला दुर्गंधी सुटली होती.

गुरांच्या कत्तलीची शस्त्रे जप्त 

या ठिकाणी गुरांची कत्तल करण्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे आढळून आली. या प्रकरणी बजरंग दलाचे दवर्ली येथील कार्यकर्ते भगवान रेडकर यांनी मडगाव पोलिस स्थानकात अधिकृत तक्रार नोंद केली आहे.

‘एफडीए’ने चरबीची चौकशी करावी

आंध्र प्रदेशातील तिऊपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचे गंभीर कारस्थान उघड करण्यात आल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर खारेबांद येथील या कत्तलखान्यात गुरांच्या चरबीने भरलेले 41 डबे आढळून आल्याने बजरंग दलाने ही चरबी कुठे वापरली जात होती, याची सखोल चौकशी सरकारच्या ‘एफडीए’ खात्याने करावी अशी मागणी केली आहे.

हिंदुंच्या खाद्यपदार्थांत चरबी?

या चरबीचा वापर काही हॉटेल्समधील बिर्याणीत केला जात असावा, असा कयात व्यक्त करण्यात येत आहे. गुरांच्या चरबीचा वापर हिंदूंच्या खाद्य पदार्थांत करून हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचे हे कटकारस्थान असू शकते अशी शक्यताही बजरंग दलाने व्यक्त केली आहे.

तब्बल 82 गुरांची कत्तल केल्याचा संशय

एक डबा पूर्ण भरण्यासाठी दोन गुरांची कत्तल करावी लागते, या ठिकाणी पूर्ण भरलेले 41 डबे सापडल्याने या कत्तलखान्यात 82 गुरांची कत्तल केली असावी अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

सागवानचे ओंडकेही कत्तलखान्यात

या बेकायदा कत्तलखान्यात सागवान लाकडाचे चार मोठे ओंडके बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आढळून आले आहेत. हे सागवानचे ओंडकेही बेकायदेशीर असावे. ते कुठून आणले होते, याची चौकशी वनखात्याने करावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

एफडीए, वनखात्याने चौकशी करावी

बजरंग दलाने मडगाव पोलिसात तक्रार केल्यानंतर चरबीच्या डब्यांची तपासणी करावी यासाठी एफडीएकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तसेच सागवानचे ओंडके आढळून आल्याने वनखात्याकडेही तक्रार केली जाणार आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न

बजरंग दलाचे कार्यकर्ते जेव्हा या कत्तलखान्याजवळ पोचले, तेव्हा त्यांना मुस्लीम महिलांनी रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांवर दगड फेकून मारण्याचा प्रकारही घडला. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयमी वृत्ती दाखविताना कत्तलखान्यात आत प्रवेश करून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले.

कत्तलखान्याचा चालक अस्लम बेपारी गायब

हा कत्तलखाना अस्लम बेपारी हा चालवित होता अशी माहिती पोलिस तपासात आढळून आली असून त्याच्यासहीत कुटुंबीयांवरही मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या अस्लम बेपारी गायब झाला असून मडगाव पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसानी भारतीय न्याय संहितेच्या 325 तसेच 3 (5) कलमाखाली, गोवा पशु संरक्षण कायद्याच्या 4, 5, 8 व 10 कलमाखाली, ‘गोवा, दमण व दी गो संरक्षण कायद्याच्या 3,5, 8 कलमाखाली आणि प्रिव्हेन्शन ऑफ व्रुएल्टीच्या 11(1) कलमाखाली गुन्हा क्र. 76/2024 नोंद करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.