Ratnagiri : बेकायदेशीर चोरुन राहणं पडलं महागात, बांग्लादेशी महिलेला शिक्षा
रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे आली होती आढळून
रत्नागिरी : बेकायदेशीर वास्तव्य केल्याचे आढळून आलेल्या बांग्लादेशी महिलेला रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सहा महिने साधा कारावास व 500 रुपये दंड असे शिक्षेचे स्वरुप आहे. सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहिल भोंबल (30, ऱा साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे भोंबल या बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार शहर पोलिसानी तिला अटक करुन गुन्हा दाखल केला होता.
बांग्लादेशी नागरिक असलेली सलमा भोंबल ही मागील आठ वर्षापासून भारतात वास्तव्य करत होती. तसेच या महिलेने भारतात वास्तव्य करत असताना आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केली असून विवाहही केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी तिच्यावर भा.दं.वि. कलम 318, 336(3) तसेच पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चा नियम 3(ए), 6(ए) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14(अ) व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले. या गुह्याचा तपास शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केला.
तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अॅड आऱ एस़ विंचुरकर यांनी युक्तीवाद केला. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार दीपाली साळवी व अभिषेक पाटील यांनी काम पाहिले.