स्मार्ट सिटीमध्ये नियमबाह्या नियुक्ती
मंजुनाथ बनशंकरी यांचा आरोप, सखोल चौकशीची मागणी
बेळगाव : बेळगाव स्मार्टसिटी लिमिटेडमध्ये नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयटीआयआयटीएस 2.0 या प्रकल्पासाठी ‘प्रकल्प समन्वयक’ पदाची नियुक्ती नियमबाह्यरित्या करण्यात आली आहे. अनेक नियम धाब्यावर बसून काही उमेदवारांना फायदा होईल अशा पद्धतीने बदल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंजुनाथ बनशंकरी यांनी केला आहे. मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्मार्टसिटीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. प्रकल्प समन्वयक पदासाठी नियुक्ती करताना ती व्यक्ती जनरल मॅनेजर किंवा एक्झिकेटीव्ह इंजिनियर या पदापेक्षा कमी दर्जाची नसावी, असा स्पष्ट उल्लेख असताना चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली.
सरकारी पदासाठी नियुक्ती करताना किमान महिनाभराचा कालावधी दिला जातो. परंतु स्मार्टसिटीने केवळ 9 दिवसांचा कालावधी नियुक्तीसाठी दिल्याने ही नियुक्ती अडचणीत सापडली आहे. स्मार्टसिटीने सहाय्यक कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता (सिव्हिल) नियुक्त करताना किमान दोन ते पाच वर्षे अनुभवाची अट घातली होती. परंतु प्रकल्प समन्वयक पदासाठी अनुभवाची कोणतीही अट दिली नाही. स्मार्टसिटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना हिताचे व्हावे यासाठी काही बदल केल्याचा आरोपही त्यांनी केला. ही नियुक्ती नियमबाह्य असून याबाबत राज्य सरकारने सखोल चौकशी करावी. इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती देताना कोणताच विचार केला नसल्याने संबंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी मंजुनाथ बनशंकरी यांनी केली. त्यांच्यासोबत अॅङ शिल्पा गोडीगौडर उपस्थित होत्या.