आयआयटी हैदराबादच्या विद्यार्थ्याला 2.5 कोटींचे रेकॉर्डब्रेक पॅकेज
शैक्षणिक संस्थेसाठी विक्रमी कामगिरी झाल्याने नावलौकिक वाढणार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी हैदराबाद) येथे कॅम्पस भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येथे एका अंतिम वर्षाच्या संगणक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला एका प्रसिद्ध डच कंपनीने दरवर्षी 2.5 कोटी रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. त्याच्या या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे पॅकेज केवळ या वर्षीचेच नाही तर आयआयटी हैदराबादच्या इतिहासातील सर्वात मोठे असल्याचे सांगितले जात आहे.
आयआयटी हैदराबादची स्थापना 2008 मध्ये झाली होती. या स्थापनेपासून कोणत्याही विद्यार्थ्याला इतके उच्च पॅकेज मिळालेले नाही. रेकॉर्डब्रेक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्याचे नाव एडवर्ड वर्गीस असे आहे. एडवर्ड वर्गीस आता जुलैमध्ये जागतिक व्यापार फर्म ऑप्टिव्हारमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात करेल. महत्त्वाचे म्हणजे, दोन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याला ही प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाली आहे. आयआयटी हैदराबादच्या प्लेसमेंट सेलनुसार, एडवर्डला मिळालेली ही ऑफर संस्थेच्या स्थापनेपासूनची सर्वात मोठी आहे.
इंटर्नशिपचे प्लेसमेंटमध्ये रुपांतर
21 वर्षीय एडवर्डचा जन्म हैदराबादमध्ये झाला आहे. परंतु त्याने 7 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण बेंगळूरमध्ये घेतले होते. 2022 मध्ये त्याने जेईई मेनमध्ये एआयआर 1100 आणि जेईई अॅडव्हान्स्डमध्ये एआयआर 558 मिळवले होते. 2025 मध्ये त्याने कॅट परीक्षेत 99.96 टक्के गुण मिळवले होते. एडवर्ड वर्गीसला दोन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर ही ऑफर मिळाली. त्याने त्याच्या इंटर्नशिपचे प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये रुपांतर केले. यापूर्वी, त्याचा समावेश टॉप 100 कोडर्समध्ये झाला होता. त्याचे पालक देखील अभियंते आहेत.
ऑफर मिळाल्यानंतर एडवर्ड वर्गीस समाधानी
ऑफर मिळाल्यानंतर एडवर्ड वर्गीस याने समाधान व्यक्त केले. हैदराबाद आयआयटीची प्रतिष्ठा कंपन्यांना आमच्या कॅम्पसमध्ये आकर्षित करेल हे मला माहित होते. मी फक्त या कंपनीसाठी मुलाखत देण्याची तयारी सुरू केली होती. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात स्पर्धात्मक प्रोग्रामिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. जिद्द आणि चिकाटीमुळेच देशातील टॉप 100 स्पर्धात्मक प्रोग्रामरमध्ये आपल्याला स्थान मिळाल्याचे वर्गीस याने स्पष्ट केले.