कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोडारमधून आयआयटी हद्दपार

01:12 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती : सरकारची माघार, जनतेचा विजय

Advertisement

पणजी : आयआयटी प्रकल्प पूर्णत्वास आला असता तर कोडार गाव जगाच्या नकाशावर पोहोचला असता. परंतु तेथील स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे आता नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी कोडार कोमुनिदादचे अध्यक्ष प्रशांत गांवकर, सरपंच मधू खांडेपारकर आणि शिरोडा पंच सदस्य अक्षय गांवकर यांची उपस्थिती होती. याबाबत काही दिवसांपूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांकडे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी, ‘स्थानिकांना नको असेल तर प्रकल्पासाठी अन्यत्र जागा शोधुया’, असे सांगितले होते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर सरकारनेच आयआयटीसाठी कोडारचा विचार सोडून दिला, असे शिरोडकर म्हणाले. खरे तर आयआयटी सारख्या प्रकल्पांची गरज ओळखून देशात आतापर्यंत 22 ते 23 ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये तर या संस्थेचे एकापेक्षा जास्त कॅम्पस आहेत.

Advertisement

त्यावरून या संस्थेचे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच गोव्यानेही आयआयटीसाठी प्रयत्न सुरू केले होते व केंद्रानेही त्याला पूर्ण समर्थन, मान्यता दिली होती. परंतु प्रत्येकवेळी त्याला विरोधाचाच सामना करावा लागला. त्यातून आता कोडार येथूनही हा प्रकल्प बारगळला आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, कोडार येथे होणाऱ्या विरोधानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रतिक्रिया देताना सरकारने हा कॅम्पस फर्मागुडीत आणल्यास त्याचे स्वागत करणार असल्याचे सांगितले होते. त्यासंबंधी शिरोडकर यांना विचारले असता, त्यासंदर्भात आता मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या कित्येक वर्षांपासून आयआयटीची एक शाखा फर्मागुडी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमध्ये चालत आहे. तूर्तास ती तेथेच सुरू राहणार आहे. मात्र त्यांना पूर्ण क्षमतेने स्वतंत्र कॅम्पस उभारण्यासाठी जमीन हवी होती. ही जमीन थोडी थोडकी नसून किमान 10 लाख चौरस मिटर देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. त्यादृष्टीने राज्यात विविध ठिकाणच्या जमिनींची निवड करण्यात आली. परंतु काही ठिकाणी प्रखर विरोधातून जनक्षोभ उसळला तर काही ठिकाणी देऊ केलेली जागा अयोग्य वाटल्याने नापसंती दर्शविण्यात आली होती.

विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत

कोडारमधून आयआयटी प्रकल्प रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विविध विरोधी पक्षांनी जोरदार स्वागत केले आहे. कोडार ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनात त्यांना संपूर्ण पाठिंबा देणारे गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, आरजी आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी त्यासंदर्भात समाधान व्यक्त करताना हा जनशक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे.

जनशक्तीसमोर सरकार झुकले 

गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया देताना, ‘कोडार येथून आयआयटी प्रकल्प रद्द होणे हा भाजपच्या अहंकारावर लोकांच्या इच्छाशक्तीचा विजय’ असल्याचे म्हटले आहे. जनशक्तीसमोर हे सरकार झुकले असून कोडारवासियांची एकसंघता जिंकली असून यापुढेही आम्ही अशाचप्रकारे उभे राहून अन्यायाविरोधात आवाज काढणार आहोत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

आयआयटी गोव्यासाठी अव्यवहार्य

खरे तर आयआयटी प्रकल्प गोव्यासाठी व्यवहार्य नाही. कारण त्यांना हवी असलेली महाप्रचंड जमीन आम्ही देऊ शकत नाही. ती द्यायची झाल्यास येथील वने आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रे नष्ट करावी लागतील, जे गोव्याच्या हिताचे नाही. त्यामुळे सरकारने केंद्राला पत्र लिहून गोव्यासाठी हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे कळवावे आणि तो कायमस्वऊपी रद्द करावा, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे. आम्ही नेहमीच गोमंतकीयांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article