समस्यांकडे दुर्लक्ष; मात्र फलकांवर कारवाई
काकतीवेस परिसरासह शहापूर भागामध्येही मोहीम : शहरवासियांतून मनपाच्या आडमुठ्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी
बेळगाव : शहरामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या असताना मनपा अधिकाऱ्यांकडून कन्नडसक्तीसाठी फलक हटाव मोहीम सुरूच ठेवली आहे. राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अधिकाऱ्यांनी इतर समस्यांकडे दुर्लक्ष करून फलक तपासणी मोहीम गतीने सुरू केली आहे. यामुळे शहरवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील आस्थापनांवर लावण्यात आलेल्या फलकांवर 60 टक्के कन्नड व 40 टक्के इतर भाषेमध्ये लिहिण्यात यावे, याबाबतचा आदेश सरकारने जारी केला आहे. अधिकाऱ्यांनाही याची अंमलबजावणी करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांकडून नियम उल्लंघन केलेले फलक हटाव मोहीम गतीने राबविण्यात येत आहे. शहरामध्ये अनेक समस्या असताना केवळ भाषेच्या हट्टापाई सरकारकडून अधिकाऱ्यांना फलक हटविण्याच्या मोहिमेवर जुंपण्यात आले आहे. शहरामध्ये अनेक भागात पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, याबरोबरच नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी याच कामात गुंतले आहेत. याबद्दल शहरवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ भाषेच्या द्वेषापोटी व कन्नड संघटनांच्या दबावामुळे मनपा अधिकाऱ्यांकडून शहरातील आस्थापनांवरील नियम उल्लंघन केलेले फलक हटविले जात आहेत. गुरुवारी शहरातील काकतीवेस परिसरासह शहापूर भागामध्येही मनपा अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.