‘इफ्फी’मुळे निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू, श्री श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन
पणजी : गेल्या दोन दशकांपासून गोव्यात सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रवास हा भरारी घेत आहे. गेल्या दोन दशकात इफ्फी आणि गोवा हे समानार्थी शब्द बनले आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास वाव मिळाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात सांगितले. ‘यंग फिल्ममेकर्स : द फ्युचर इज नाऊ’ ही थीम साजरी करत गोव्यात काल बुधवारी 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शानदार सुरवात झाली. कल्पवृक्षाला पाणी घालून श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्मंत्री डॉ. प्रमोद सावंत, बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, अभय सिन्हा, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरुगन यांचा व्हिडिओ संदेश
सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुऊगन यांनी व्हिडियोद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. आर्थिक धोरणात्मक चौकट सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि गोवा सरकारला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगितले.
‘वेव्हस ओटीटी’चे अनावरण
उद्घाटन सोहळ्यात प्रख्यात भारतीय चित्रपटातील निर्माते, कलाकार, दिग्दर्शक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार भारतीच्या ‘वेव्हस ओटीटी’चे अनावरण केले.
मूळ गोष्टींना विसरून चालणार नाही
दिग्दर्शक सुभाष घई यांनी चित्रपटसृष्टीचे आधुनिकीकरण होत असताना कलाकारांनी आपल्या काही मूळ गोष्टींना विसरून चालणार नाही. कारण आज चित्रपटसृष्टीत नवीन नवीन गोष्टी येत असल्यातरी काही कलाकार हे आपल्या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे त्यांनी आपल्याला आलेल्या अनुभवाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. यावेळी केरळ, झारखंड, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य अनेक राज्यांतील कलाकारांनी पारंपरिक संगीत, नृत्ये सादर केली. या वेळी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या योगदाची दखल दिग्दर्शक, निर्मात्यांनी घेतली. अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा वेळेत सुरू न झाल्याने रसिकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. संध्याकाळी 4.30 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम असताना संध्याकाळी 7 नंतर कार्यक्रमाला सुरवात झाल्याने रसिकांमध्ये नाराजी पसरली होती.
संगीत हेच जगण्याचे साधन : श्री श्री रविशंकर
जगात आज काही बाबतीत उद्रेक दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे माणसाची बदलत चाललेली विचारसरणी हे होय. तरीही कितीही उद्रेकाचे वातावरण झाले तरी जीवनात संगीत हेच जगण्याचे साधन आहे. हे आधुनिक काळातही नसून, पूर्वजांपासून चालत आले आहे. कारण याचा प्रत्यय देवी-देवतांमध्येही दिसून येतो. श्रीकृष्णाच्या हाती बासरी आहे, श्री महादेवाच्या हाती डमरू आहे. ह्या सर्व गोष्टी संगीतालाच धरून आहेत, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.